पिंपरी - पिंपरी येथील महिंद्रा ॲंथिया सोसायटी परिसरातील दहा भटक्या श्वानांना रविवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास अन्नामधून विष दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये पाच श्वान दगावले आहेत. याबाबत संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिंद्रा ॲंथिया सोसायटी परिसरात गेल्या तीन वर्षापासून तीस भटक्या श्वानांना सोसायटीमधील काही जणांकडून जेवण दिले जाते. त्यासाठी भारतीय प्राणी कल्याण मंडळाने (एडब्ल्यूबीआय) तीन ठिकाणे निश्चित करून दिली आहेत. त्याठिकाणी त्यांना खाऊ घातले जाते.
मात्र, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी प्रिया गुगळे यांच्यासह मनीष सिंग, दीपशिका सिंग, कैलास आयवळे हे श्वानप्रेमी नेहमीप्रमाणे खाद्य घेऊन गेले. तिथे रोज दहा श्वान यायचे. रविवारी एकही आला नाही. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी (पॉइंट) आठपैकी दोन श्वान आढळले नाहीत. एक अस्वस्थ आढळले. त्याला घेऊन काळेवाडीतील पशुवैद्यकीय बळिराम कारेगावकर यांच्याकडे नेले. त्यावेळी श्वानांवर विषबाधा झाल्याचे लक्षात आहे.
दरम्यान, सोसायटी परिसरात तीन श्वान मृतावस्थेत आढळले. आठ श्वानांवर उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे दीपशिका सिंग यांनी सांगितले. सहा श्वानांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत.
महिंद्रा ॲंथिया सोसायटी परिसरात बऱ्याच वर्षांपासून श्वानांचा अधिवास आहे. त्यांना जेवणाची वेळ ठरवून दिली आहे. सोसायटीच्या गेटबाहेर त्यांना जेवण दिले जाते. मात्र, काहींना याचा त्रास होत असल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आले आहे. याविरोधात फिर्याद दिली आहे.
- दीपशिखा सिंग, महिंद्रा ॲंथिया रहिवासी, श्वानप्रेमी
भटक्या श्वानांना खाऊ घालण्यावरून हा वाद झाला आहे. इतक्या क्रूरपणे निष्पाप जीवांना मारण्यात आले आहे. हे कृत्य करणाऱ्यांवर प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावावा.
- पद्मिनी स्टम्प, मिशन पॉसिबल फाउंडेशन, श्वानप्रेमी
कायदा काय सांगतो?
भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३२५ ः कोणीही प्राण्यांना मारणे, विष देणे, अपंग करणे गुन्हा आहे. त्यास पाच वर्षे कैद व दंडाची शिक्षा होऊ शकते.
प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (क) : कोणत्याही पाळीव प्राण्यांना अवास्तवपणे ड्रग्ज किंवा इतर कोणतेही हानिकारक पदार्थ देणे बेकायदेशीर ठरते. या कलमान्वये, कोणत्याही पाळीव प्राण्याला अनावश्यक वेदना किंवा दुःख होऊ शकणाऱ्या हानिकारक पदार्थांचे सेवन करणे किंवा त्यांना देणे हा गुन्हा मानला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.