Video : लाच घेणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्यांबाबत पिंपरी महापौर आयुक्तांकडे ही मागणी करणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

महापौर उषा ढोरे, प‌क्षनेते नामदेव ढाके यांची पत्रकार परिषदेत माहिती

पिंपरी : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासाठी केलेल्या वैद्यकीय उपकरणे खरेदीत गैरव्यवहार व ठेकेदाराकडून थेट बँक खात्यावर लाच घेणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी लवकरात लवकर कारवाई करावी. तसेच, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करणार, अशी माहिती महापौर उषा ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके व स्थायी समिती सभापती संतोष लोंढे उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

ढाके म्हणाले, "अधिकाऱ्यांनी बँक खात्यावर पैसे घेतले असतील त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही आयुक्तांना सांगितले आहे. आम्ही अथवा आमच्या पक्षाने कधीही गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घातलेले नाही. आयुक्तांकडे आम्ही तक्रार केली आहे." 

भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी तीन अधिकाऱ्यांविरुद्ध सर्वसाधारण सभेत गैरव्यवहाराबाबत आरोप केले होते. त्यावेळी आयुक्तांनी तीन सदस्यीय समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार समिती नियुक्त केली आहे. प्राथमिक चौकशी झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासे केले आहेत. अद्याप आणखी चौकशी केली जाणार आहे. मात्र, आयुक्तांनी अद्याप कारवाई केलेली नाही, असे म्हणत कामठे यांनी रविवारी फेसबुक लाइव्ह करून गैरव्यवहाराबाबत आरोप केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिकांना आवाहन करीत आयुक्तांचे संपर्क क्रमांक जाहीर केले. त्यानंतर आयुक्तांकडे कारवाई करण्याबाबत विचारणा करणारे व चौकशी करणारे फोन सुरू झाले. अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक सार्वजनिक करून त्रास देणे योग्य आहे का? व चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणावर कारवाई करणे योग्य आहे का? चौकशीला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे का, अशी चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: take action against the officials involved in the bribery case said pimpri mayor