Video : जीमच्या झगमगाटातही पिंपरी-चिंचवडमध्ये तालमी अशा तग धरतायेत

Video : जीमच्या झगमगाटातही पिंपरी-चिंचवडमध्ये तालमी अशा तग धरतायेत

पिंपरी : काही वर्षांपूर्वी तालमीत जोरजोराने श्‍वासोच्छवासाचा घुमणारा आवाज रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही ऐकू येत असे. मात्र गेल्या काही वर्षांत हा आवाज दिवसेंदिवस कमी होत असला, तरी बदलत्या काळातही तग धरून आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेल्या जीमच्या जमान्यात तालमींचे अस्तित्व अद्याप टिकून आहे. काही वर्षांपूर्वी तालमींमध्ये घाम गाळून शरीर कमावणे, हा तरुणांचा छंद होता. जी मुले तालमीत जात नसत त्यांना त्यांचे वडील दरडावून व्यायामास उद्युक्त करीत असत. 

काय असते तालीम 

सध्याच्या पिढीतील अनेक तरुणांना जीम माहिती आहे. मात्र तालीम अनेकांना माहिती नसते. एका आखाड्यात पोयटा माती पसरलेली असते. त्यामध्ये तेल, हळद, जिलबीचा रंग आणि कापूर मिसळण्यात येतो. त्यामुळे कुस्ती केल्यावरही त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. मातीमध्ये हवा खेळती रहावी, यासाठी ती अधूनमधून वर-खाली करावी लागते. तालमीत येणारी मुलेच ही कामे करतात. 

कसा होतो देखभाल खर्च 

काही गणेश मंडळांच्या ताब्यात तालमी आहेत. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्तेच तालमीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करतात. काही ठिकाणी तालमीत कुस्ती शिकायला येणारी मुले स्वखर्चातून तालमीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करतात. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय होतोय बदल 

सध्याच्या तरुणांचा कुस्तीपेक्षा जीममध्ये घाम गाळून पीळदार शरीरयष्टी कमाविण्याकडे जास्त कल आहे. त्यामुळे या तरुणांना आकर्षित करण्यासाठी काही मंडळांनी तालमीतच व्यायामासाठीची अत्याधुनिक मशिनरी बसविली आहे. चिंचवड येथील हनुमान मित्र मंडळाच्या पागेच्या तालमीत असा प्रयोग करण्यात आला आहे. 

सद्यःस्थिती काय?

तालमींमध्ये स्वच्छता राखली जाते. प्रत्येक तालमीत मारुतीची मूर्ती असते. त्याला वेळोवेळी शेंदूराचे लेपन केले जाते. सध्या तालमी बंद असल्याने या मारुतीच्या मूर्तीला घातलेले फुलांचे हारही वाळलेले दिसले. 

सरकारची भूमिका 

कुस्तीमध्ये राज्य पातळीवर चांगले यश मिळविलेल्या कुस्तीगीराला पोलिस, रेल्वे यामध्ये नोकरी मिळते. मात्र अशा खेळाडूंव्यतिरिक्त अन्य कुस्तीगीरांव्यतिरिक्त उत्पन्नाचे ठोस साधन नसेल, तर कुस्तीगिरांची परिस्थिती अवघड होते. यासंदर्भात चिंचवड येथील जुन्या पिढीतील कुस्तीगीर तानाजी निंबाळकर यांनी सांगितले, "नव्याने शिकण्यासाठी येणाऱ्या तरुणांना आम्ही कुस्तीचे प्रशिक्षण देण्यास तयार आहे. मात्र, सध्याच्या तरुणांमध्ये कुस्तीची आवड तुलनेने कमी आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकडे बोलतात 

  • शहरातील तालमींची संख्या - 100 हून अधिक 
  • तालमींची सध्याची संख्या - 30 ते 40 
  • जीमच्या तुलनेत तालमीत येणाऱ्या तरुणांचे प्रमाण - 25 टक्के 


एका संपूर्ण कुटुंबासाठी लागणारा खर्च एका पैलवानासाठी करावा लागतो. 1984 मध्ये एका पैलवानाच्या खुराकासाठी महिन्याला 800 रुपयांचा खर्च येत असे. सध्या त्यासाठी महिन्याला 20 हजार रुपयेही कमी पडत आहेत. ज्या मुलांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशी मुले कुस्ती शिकण्यास फारशी उत्सुक नाहीत. मात्र ज्या मुलांना कुस्ती शिकण्याची आवड आहे, त्यांच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. 

- पोपटराव फुगे, उपाध्यक्ष - पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटना 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com