लॉकडाउनमुळे चहाविक्री बंद; व्यावसायिकांना आर्थिक फटका 

लॉकडाउनमुळे चहाविक्री बंद; व्यावसायिकांना आर्थिक फटका 

पिंपरी - ती तल्लफच मुळी अशी, की तिला ना वेळ ना काळ. सकाळ-संध्याकाळ असो, की दुपार...त्या वाफाळत्या घोटांचा आस्वाद लाजवबच. या घोटासरशी रंगणारी चर्चेची मैफल देखील न्यारीच! मात्र एरवी झडणारी ‘चाय पे चर्चा’ लॉकडाउनमुळे बंद असल्याने चहाशौकीन बेचैन आहेत. तर चहाविक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. 

चहाशौकीनांची गरज ओळखून पिंपरी-चिंचवडमध्ये ठिकठिकाणी चहाच्या टपऱ्या उभ्या राहिल्या. मागील पाच-सहा वर्षांपासून चहा विक्रीकडे मोठा व्यवसाय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. त्यामुळे मोठमोठ्या ब्रॅंडच्या नावाखाली चहाचे मोठे स्टॉल सुरू झाले आहेत. हे स्टॉल सुरू करण्यासाठी दोन लाखांपासून दहा लाखांपर्यंत फ्रॅंचाईजी दिली जात आहे. याशिवाय वीस हजारांपासून चाळीस हजार रुपयांपर्यंत भाडे देऊन स्टॉल चालवले जात आहेत. मात्र, लॉकडाउनमुळे चहाचे सर्व स्टॉल बंद असल्याने या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच चहाशौकिनांचाही हिरमोड झाला आहे. 

टपरीवर उदरनिर्वाह 
छोट्या टपरीवर चहा विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. टपरीवर दररोज किमान एक ते पाच हजार रुपयांचा धंदा केला जातो. तर मोठ्या ब्रॅंडच्या दुकानांमध्ये दररोज साधारणतः पंधरा ते वीस हजारांची उलाढाल होत असते. या व्यवसायातून किमान दीड हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. 

पिंपरी-चिंचवड शहरात 

सुमारे १०० 
चहा विक्रीची मोठी दुकाने 

सुमारे १५०० 
छोट्या टपऱ्या

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चहाचे प्रकार 
साधा, स्पेशल, मसाला, मटका, गुळाचा, इराणी, ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी 

कपबशीचा ट्रेंड 
चहाच्या कपाला १० ते १२ रुपये आकारले जातात. पूर्वी किटलीतील चहा कपबशीमध्ये दिला जायचा. मात्र, कपबशीची जागा काचेच्या ग्लासने घेतली होती. मात्र, आता पुन्हा कपबशीमध्येच चहा देण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. 

आकर्षित करणारे स्लोगन 
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांच्या फलकांवर वेगवेगळ्या स्लोगनचा वापर केला जात आहे. यामध्ये कवितांचाही समावेश असल्याचे पाहायला मिळते. या माध्यमातून चहाचे महत्व पटवून दिले जात आहे. 

भेट व गप्पांचे ठिकाण 
चहाचा स्टॉल म्हटले, की मित्रमंडळींनी एकत्र येत गप्पा मारण्याचे ठिकाण, हे जणू समीकरणच बनले आहे. चहाचा आस्वाद घेत या स्टॉलवर मनमोकळ्या गप्पा रंगलेल्या पाहायला मिळतात. वैयक्तिक विषयांसह अगदी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांचा या गप्पांमध्ये समावेश असतो. 

‘सोशल मीडिया’वर भावना 
चहाशौकीन सध्या एखाद्या प्रेयसीप्रमाणे चहाला ‘मिस’ करीत आहेत. याबाबत ‘सोशल मिडिया’वर देखील चहाशौकिन त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत. आवडता चहा उपलब्ध होत नसल्याने आपण किती बेचैन आहोत, हे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com