पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून शिक्षक भरती

आशा साळवी
Saturday, 12 September 2020

  • माध्यमिक शाळांमध्ये मानधनावर 107 जण घेण्याचा निर्णय 

पिंपरी : महापालिकेत सरळ सेवेने शिक्षक भरतीस बंदी असल्याने स्थायी समितीच्या अधिकारात सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक कोटी 12 लाख 35 हजार खर्च करून मानधनावर शिक्षक भरती करण्यात येत आहे. त्यात महापालिकेच्या 15 अनुदानित मराठी, तर सहा विनाअनुदानित उर्दू शाळेसाठी 107 शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय माध्यमिक विभागाने घेतला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या माध्यमिक विभागाअंतर्गत मराठी व उर्दू माध्यमाचे 24 विद्यालये कार्यरत आहेत. 18 पैकी 3 विनाअनुदानित मराठी, तर उर्दू माध्यमाची सहा विनाअनुदानित विद्यालये आहेत. या विद्यालयांमधून आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सरकारकडून शिक्षक भरतीला मनाई केली असल्याने दरवर्षी मानधनावर शिक्षक भरती करावी लागते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. दर सहा महिन्यांनी नव्या शिक्षकांसाठी जाहिरात काढावी लागते. या वर्षी महापालिकेच्या मराठी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये 85 शिक्षकांची पदे तसेच उर्दू माध्यम विनाअनुदानित माध्यमिक सहा शाळांमधील 22 असे 107 शिक्षकांची पदे भरण्यासाठी माध्यमिक विभागाने स्थायी समितीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यात सर्वाधिक इंग्रजी विषयासाठी 38 शिक्षकांची मागणी केली आहे. 

घड्याळी तासिका बंद 
गेल्या वर्षी 78 शिक्षकांची घड्याळी तासिकेवर भरती केली होती. त्यांना तासिका 85 रुपये होते. त्यानुसार त्यांना प्रत्येक आठवड्याला सरासरी 28 तास आणि महिन्याला 128 तास भरल्यावर मासिक साडेनऊ हजार रुपये वेतन देण्यात येणार होते. पण तेवढे तास भरायचे नाही. परिणामी वेतन कमी मिळू लागल्यावर अनेक शिक्षक सोडून गेले. त्याहीअगोदर आठ हजार रुपये मानधनावर शिक्षण सेवकांची भरती व्हायची. तेही सोडून गेले. त्यामुळे यावर्षी कमाल व किमान कायद्यानुसार 17 हजार 500 रुपये मानधन दिले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या तुकड्यांच्या संख्येनुसार काही विषयांचे शिक्षक, सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती व रजा आदी कारणांमुळे संख्या कमी झाली असून, विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक असून, त्यांच्या मुलाखत न घेता मेरीटनुसारच निवड करण्यात येणार आहे.
- पराग मुंढे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग 

  • भरती 2019 : 78 
  • भरती 2020 : 107 
  • मासिक खर्च : 18 लाख 72 हजार 500 
  • एकूण खर्च : एक कोटी 12 लाख 35 हजार  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher recruitment at pimpri chinchwad municipal corporation schools