मावळात आज दहा नवे पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

मावळ तालुक्यात सोमवारी  दिवसभरात माळवाडी व सोमाटणे येथील एकाच कुटुंबातील प्रत्येकी चार, तर तळेगाव व कामशेत येथील प्रत्येकी एक अशा एकूण दहा जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात सोमवारी  दिवसभरात माळवाडी व सोमाटणे येथील एकाच कुटुंबातील प्रत्येकी चार, तर तळेगाव व कामशेत येथील प्रत्येकी एक अशा एकूण दहा जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १४५ झाली आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या तळेगाव येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

माळवाडी येथील एकाच कुटुंबातील ३५ वर्षीय पुरुष, त्याची ३२ वर्षीय पत्नी, पाच वर्षांचा मुलगा व नऊ वर्षाची मुलगी अशा चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. लक्षणे जाणवल्याने ते ३ तारखेला रावेत येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले होते.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमाटणे येथील एका ६४ वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल ३ तारखेला पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील पत्नी, मुलगा व लोणावळा येथे राहणारी त्यांची मुलगी व नातु अशा चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुलगी व नातु गेल्या तीन महिन्यांपासून सोमाटणे येथे राहावयास आहेत. तळेगाव येथील एका ४२ वर्षीय पुरुषाचा अहवाल १ तारखेला पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील ४७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कामशेत येथील ४५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणे आढळल्याने तिला तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी दिवसभरात दहा नवे रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १४५ झाली आहे. त्यात शहरी भागातील ५६, तर ग्रामीण भागातील ८९ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ४६, लोणावळा आठ; तर वडगाव येथे दोन अशी रुग्ण संख्या झाली आहे. आतापर्यंत मृतांची संख्या सात झाली असून, ६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी १५ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या ७२ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ten new corona positive in maval