पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 January 2021

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरीहून चिंचवड स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील पोलिस उपायुक्त कार्यालयासमोरील रस्त्यावर बेवारस बॅग असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मिळाली. काही क्षणातच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील पोलिस उपायुक्त कार्यालयासमोरील रस्त्यावर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकाडून तपासणी केल्यानंतर या बॅग मध्ये कपडे असल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. उस्माबाद येथून प्रवासावरून आलेल्या पोलिस कर्मचारी महिलेकडूनच ही बॅग रस्त्यावर विसरल्याचे नंतर समोर आले. 

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरीहून चिंचवड स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील पोलिस उपायुक्त कार्यालयासमोरील रस्त्यावर बेवारस बॅग असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मिळाली. काही क्षणातच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

PMC Budget 2021-22 : ​पाचशे इलेक्ट्रीक बस खरेदी करणार

रस्त्यावरील वाहतूक बंद करून परिसरात बॅरिकेड लावण्यात आले. शंभर मीटर परिसरातील दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, बघ्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर श्‍वानाने बॅगेची तपासणी केली. त्यानंतर पथकातील जवानांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे असल्याचे निदर्शनास आले. यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. एक तास हा थरार सुरू होता. 

दरम्यान, काळेवाडीतील गुलमोहर सोसायटी येथे उगले दाम्पत्य राहत असून यातील महिला पोलिस आयुक्तालयात नाईक पदावर कार्यरत आहे. तर त्यांचे पती खासगी कंपनीत नोकरी करतात. दरम्यान, महिला पोलिस कर्मचारी त्यांच्या उस्मानाबाद येथील मूळ गावी गेल्या होत्या. शनिवारी (ता.30) सकाळी खासगी बसने त्या चिंचवड स्टेशन येथे उतरल्या. सोबत पाच ते सहा बॅग होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिंचवड स्टेशन येथून रिक्षाने घरी जात असताना एक बॅग रस्त्यावरच विसरल्या. ही बाब घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांचे पती व मुलगा रस्त्याने बॅग शोधतशोधत चिंचवड स्टेशनपर्यंत आले. दरम्यान, त्याठिकाणी बॉम्ब शोधक -नाशक पथकाकडून बॅगची तपासणी झाली होती. उगले यांनी ही बॅग आमची असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terror due to suspicious bag in front of the police office in pimpri