esakal | रेमडेसिव्‍हिर हवंय, मिळेल का?
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

रेमडेसिव्‍हिर हवंय, मिळेल का?

sakal_logo
By
टिम इ सकाळ

पिंपरी : ‘‘माझे वडील खासगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांना रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनची गरज होती. डॉक्टरांनी सहा इंजेक्शन सांगितली होती. त्यापैकी दोन पुण्यातील गुरुवार पेठेत, तर दोन भोसरीतील मेडिकल स्टोअर्समधून मिळाली. आणखी दोनची आवश्‍यकता होती. ती ब्लॅकने घ्यावी लागली. थोडे पैसे जास्त गेले; पण जीव महत्त्वाचा होता. आता तब्येत बरी आहे. कालच डिस्चार्ज मिळाला,’’ भोसरीतील तरुणाचे हे शब्द.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिक, नंदुरबार, जळगावच्या मेडिकल स्टोअर्समध्येही त्याने नातेवाइकांच्या माध्यमातून रेमडेसिव्‍हिरची विचारणा केली. कुठेही उपलब्ध होत नव्हते. अखेर, दोन इंजेक्शन जादा पैसे देऊन घ्यावे लागले. अशीच अवस्था खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बहुतांश कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाइकांची आहे. ‘रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन हवंय, मिळेल का?’ अशी विचारणा मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन करावी लागत आहे.

‘रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन - ६’ अशा आशयाचे डिस्क्रिप्शन डॉक्टर रुग्णाच्या नातेवाइकाच्या हाती सोपवतात आणि सुरू होतो, त्या इंजेक्शनचा शोध. कोणत्या मेडिकल स्टोअर्समध्ये मिळेल, यासाठी मोबाईलवर संभाषण. त्या डिस्क्रिप्शनवर रुग्णाचे नाव असते. वय असते. डॉक्टरांची सही व शिक्का असतो. तरीही सोबत लागतात रुग्णाचे वैद्यकीय तपासणीचे रिपोर्ट व आधारकार्ड अथवा त्यांची झेरॉक्स प्रत. तरीही ते इंजेक्शन सहजासहजी मिळेल, याची शक्यता कमीच. त्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांची धावाधाव ठरलेलीच आहे.

''महापालिकेने नऊ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी केली आहे. त्यापैकी गुरुवारी (ता. १५) दीड हजार इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. रुग्णसंख्येनुसार इंजेक्शनची आवश्‍यकता पडत आहे. ''

- मनोज लोणकर, उपआयुक्त, भांडार विभाग, महापालिका