esakal | बिजलीनगरमधील विस्कळीत पाणी पुरवठा कधी पूर्ववत होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

As there is no proper supply of water in Bijlinagar the society holders have submitted a statement to the Municipal Commissioner

या भागात बैठी घरे अत्यंत कमी असून इमारतीचे प्रमाण अधिक आहे. इतर परिसराच्या तुलनेत भागात रात्री उशिराने पाणीपुरवठा होत आहे.

बिजलीनगरमधील विस्कळीत पाणी पुरवठा कधी पूर्ववत होणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या महिन्यांपासून गिरिराज हौसिंग सोसायटीच्या पाणी वितरणाच्या वेळेत बदल केला आहे. सकाळ ऐवजी रात्रीच्यावेळी पाणी पुरविण्यात येत असल्याने अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठ्याला सोसायटीधारक वैतागले आहेत. शेवटी वैतागलेल्या सोसायटीधारकांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे कैफियत मांडली आहे. 

गिरिराज हाउसिंग कॉम्प्लेक्‍स आणि शाहू उद्यान परिसरात पाणी पुरवठ्याची वेळ रात्री नऊ ते पहाटे तीन वाजेपर्यंत केली आहे. या भागात बैठी घरे अत्यंत कमी असून इमारतीचे प्रमाण अधिक आहे. इतर परिसराच्या तुलनेत भागात रात्री उशिराने पाणीपुरवठा होत आहे. या भागात 100 टक्के अधिकृत नळजोडणी आहे. सर्व नागरिक नियमित व निर्धारित वेळेत पाणीपट्टी भरत आहेत. तरीही आम्हालाच रात्री पाणी येत असल्याने त्यांना उशिरापर्यंत जागावे लागत आहे.

महापालिकेतर्फे रात्री होणारा पाणी पुरवठा हा सुरवातीला अत्यंत कमी दाबाने होतो. इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर पाणी साधारण दोन ते तीन तास उशिराने पोहोचते. परिणामी पाणी भरून ठेवण्यासाठी लोकांना रात्री उशिरापर्यंत जागावे लागत आहे. कामावर जाण्यासाठी त्यांना सकाळी लवकर उठावे लागते. याचा विपरीत परिणाम देखील नागरिकांच्या दिनचर्येवर व आरोग्यावर होत असल्याने सकाळी किंवा सायंकाळी पाणी पुरवठ्याची वेळ करण्याची मागणी गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाच्या 'ब' प्रभाग अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. 

स्थानिक नागरिक विजय पाटील म्हणाले, 'बिजलीनगर रेल विहार परिसर, साईराज कॉलनीमध्येदेखील अपुरा पाणी पुरवठा समस्या आहे. पण सध्या पाणी गळती व ग्रॅव्हिटी व्हॉल्व कामाकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून त्या बाबतचे काम सुरू केले आहे. मात्र रात्री उशिरा पाणीपुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.' 

नगरसेविका करुणा चिंचवडे म्हणाल्या, बिजलीनगरमधून दापोडीपर्यंत 46 टक्‍यांना पाणी पुरवठा होतो. सकाळच्या वेळेस दापोडीपर्यंत पाणी पुरवठा करावयास असल्याकारणाने गिरिराज परिसर व बिजलीनगरच्या इतर ठिकाणी पाणीपुरवठा करता येत नाही. निदान सकाळी एक तास तरी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, असे नागरिकांना वाटते. पण तसे सध्या करणे शक्‍य नाही. कारण बिजलीनगर, शिवनेरी, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी या परिसराला फटका बसू शकतो. पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे महापालिकेने दोष दूर केल्यावर समस्या सुटेल.  
 
ब प्रभाग कार्यालयाचे वरिष्ठ पाणी पुरवठा अधिकारी सुनील अहिरे म्हणाले, दिवसा पाणी पुरवठा करण्याची सोसायटीधारकांची मागणी आहे. पण तसे करता येत नाही. बिजलीनगरमधील उंच टाक्‍या आहेत, त्यामुळे त्या भरता येत नाही. रात्रीचा पाणी पुरवठा केल्यामुळे दिवसभरात टाक्‍या भरता येत आहेत. पूर्वी कोणालाच पुरेसे पाणी मिळत नव्हते. आता वेळेत बदल केल्यामुळे इतर सोसायट्यांना मिळत आहे. 

 
संपादन - सुस्मिता वडतिले