मावळातील सह्याद्रीच्या पठारावरील धनगर समाजाची पायपीट थांबेना!

रामदास वाडेकर
Tuesday, 8 December 2020

  • दळणवळणाची व्यवस्था करण्याची सरकारकडे साकडे; आरोग्याबाबतही अनास्था 

कामशेत (ता. मावळ, जि. पुणे) : स्वातंत्र्य मिळून इतकी वरीस लोटली. पण आमच्या पठारावरील धनगर समाजाची पायपीट काही थांबली नाही, आजही आम्ही गरोदर महिलेला झोळीत टाकून दवाखान्यात आणतो. सर्पदंश झाला तरी आमचे लोक पायपीट करीत डोंगराच्या पठारावरून चालत दवाखाना गाठत्यात. सरकारने आमच्या दळणवळणाची सोय करावी इतकीच शासन दरबारी आस आहे, कांब्रे पठारावरचा राजू ठिकडे याचीही शासन दरबारी आर्त विनवणी. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मावळातील सह्याद्रीच्या पठारावरील कांब्रे पठार, कुसूर पठार, बोरवली पठार, कुसवली पठार, पाले पठार, शिरदे पठार, उकसाण पठार, करंजगाव पठार आणि वडेश्वर पठारावर ठिकठिकाणी धनगर बांधवांची वस्ती आहे. येथेच शेतीला दूधधंद्याची जोड देऊन आमची उपजीविका करतो. येथे कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. आजोबा पणजोबा येथेच वाडले आणि येथेच खपले हे पठार सोडून आम्ही कुठे जाणार आहोत. जन्म भी येथेच आणि मरण भी येथेच हाय, खंत इतकीच आहे अजून आमच्या वाड्यावस्तीवर रस्ता पोचला नाय. त्याच पायवाटेने आजोबा पणजोबा गेले. अन्‌ तीच पाऊलवाट नातवंडाच्या नशिबी आहे. पंचाहत्तरीकडे झुकलेले रामभाऊ जानकर यांचे म्हणणे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते सांगत होते ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात माझा भाचा आणि जवाईला वडेश्वर पठारावर झोपत असताना रात्री सर्पदंश झाला ते पाऊलवाटेने चालत गेले. रक्तात विष भिनले आणि उपचारात त्यांचा मृत्यू झाला. ही पठारावरची पहिली घटना नाही, आम्ही सर्पदंशाच्या अनेक घटना पाहिल्या आहेत आणि परिणाम सुद्धा भोगत आहोत. पठारावरचे अनिल आखाडे, शंकर आखाडे, रामदास ठिकडे, प्रवीण ठिकडे, बाबू आखाडे, लहू शेडगे या मंडळीचे म्हणणे. आमची तरुण पिढी दळणवळणाची सोय नाही म्हणून घरदार सोडून उपजीविकेचे साधन मिळवायला शहरात आलो खरे. पण गावच्या मातीची सर शहरात नाही. पठारावर दहीदूध खाण्याचे भाग्य शहरात नाही. आजही आमच्या पडाळीत गाई गुरे आणि वासराचे हंबरणे सुरू आहे. लालमातीत सावा, वरई, नाचणी आणि भाताचे पीक तरारून पिकते. येथे राहून आम्ही आनंदाने राहू फक्त दळणवळणाची सोय सरकारने करावी, अशी मागणी असल्याचे मारुती ठिकडे, गणेश खरात, बाळू हिरवे, लक्ष्मण हिरवे यांच्यासह पठारावरील सर्व धनगर बांधवांना आहे. याच अनुषंगाने मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना धनगर बांधवांनी निवेदन दिले आहे. यापूर्वी याच समस्येवर तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there is no transportation facility on the sahyadri plateau in maval