निगडीतील 'त्या' महिलेला लुबाडणारा निघाला केअर टेकर; पोलिसांनी असा लावला शोध

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

- चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत ठेवले होते बाथरूममध्ये डांबून 

पिंपरी : निगडी-प्राधिकरणातील उच्चभ्रू सोसायटीत एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या घरात शिरून चाकूचा धाक दाखवित वृद्धेला मारहाण केली. टॉवलने तोंड व हात बांधून बाथरूममध्ये डांबून सव्वा चार लाखांचा ऐवज लुटला. हा आरोपी वृद्धेच्या घरी दोन महिन्यांपूर्वी केअर टेकर म्हणून काम करणाराच तरुण असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एकूण दोन आरोपींना जेरबंद केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दीपक उर्फ दिप्या अंकुश सुगावे (वय 20, रा. कल्पना सोसायटी, वराळे फाटा, तळेगाव दाभाडे, मूळ- नांदेड) व संदीप उर्फ गुरू भगवान हांडे (वय 24, रा. देशमुखवाडा, चिंचवडगाव, मूळ- औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. हेमलता पाटील (वय 76, रा. गायत्री हौसिंग सोसायटी, काचघर चौकाजवळ, सेक्‍टर क्रमांक 24, प्राधिकरण, निगडी) या येथील फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. त्यांची विवाहित डॉक्‍टर मुलगी आकुर्डीत राहते. दरम्यान, सोमवारी (ता. 10) रात्री साडेदहाच्या सुमारास पाटील या घरात असताना दोघे आरोपी घरात शिरले. त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांना बेडरूममध्ये घेऊन जाऊन कपाटातील सोने-चांदीचे दागिने, कॅमेरे, महागडी घड्याळे, मोबाईल, रोकड असा एकूण चार लाख 30 हजारांचा ऐवज घेतला. त्यानंतर पाटील यांचे हात व तोंड बांधून त्यांना बाथरूममध्ये कोंडून पसार झाले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपींच्या शोधासाठी निगडी पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. तपासादरम्यान दीपक सुगावे हा दोन महिन्यांपूर्वी पाटील यांच्या घरी केअर टेकर म्हणून काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुगावे याने त्याच्या साथीदारासह हा गुन्हा केल्याची तसेच, गुन्ह्यातील चोरीचा माल विकण्यासाठी तो चिंचवडमधील थरमॅक्‍स चौकात येणार असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. दरम्यान, पीएमपी बसथांब्याजवळ दोन जण संशयितरित्या उभे असल्याचे आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडे एक दुचाकी व चोरलेले दोन कॅमेरे मिळून आले. तसेच, सुगावे याच्या घरी चोरीतील चांदीचे दागिने, घड्याळे व रोकड सापडली. अद्यापपर्यंत आरोपींकडून एक लाख 24 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर कोकाटे, हवालदार किशोर पढेर, मच्छिंद्र घनवट, सतीश ढोले, रमेश मावसकर, आत्मलिंग निंबाळकर, विजय बोडके, दिपक जाधवर, सोपान बोधवड, राजेंद्र जाधव यांच्या पथकाने केली. 

घरकामगार ठेवताना घ्या काळजी

ज्येष्ठ नागरिकांच्या घरी केअर टेकर ठेवताना अथवा इतर घरकामासाठी कामगार ठेवताना या कामगारांचे पोलिसांमार्फत व्हेरिफिकेशन करावे. तसेच, संबंधित कामगाराचा पत्ता, मूळ पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड आदी कागदपत्रे घेऊन ठेवावीत. कामगारांची योग्य खात्री करूनच त्यांना कामावर ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thieving caretaker who robbed the woman in nigdi