पिंपरी-चिंचवड एमआयडीसीतील हजारो कंपन्यांना महावितरण संपाचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitaran

महावितरण संपाचा फटका पिंपरी चिंचवड औद्योगिक (एमआयडीसी) भागातील हजारो कंपन्यांना बुधवारी बसला.

Mahavitaran Strike : पिंपरी-चिंचवड एमआयडीसीतील हजारो कंपन्यांना महावितरण संपाचा फटका

पिंपरी - महावितरण संपाचा फटका पिंपरी चिंचवड औद्योगिक (एमआयडीसी) भागातील हजारो कंपन्यांना बुधवारी (ता. ४) बसला. भोसरी एमआयडीसी सेक्टर क्रमांक ७ व टी ब्लॉकमध्ये सकाळी ८.१५ ते १२.१५ या वेळेत वीज गेल्याने कंपन्यांचे काम ठप्प झाले. कामगारांना चार तास बसून राहावे लागल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला.

नवीन वर्षालाच उद्योगांना ग्रहण चालू झाल्याचे दिसतआहे, असे मत उद्योजकांनी व्यक्त केले. एमआयडीसी परिसरात काही भागात वीज गेल्यामुळे हजारो कंपन्या बंद होत्या. तर; तळवडे, चिखली-कुदळवाडी या भागातही दिवसभरात अनेक वेळा वीज गेली. महावितरणने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. सरकारने पर्यायी व्यवस्था केली असल्याचे जरी सांगत असले तरी मनुष्यबळच नसल्यामुळे पिंपरी चिंचवड एमआयडीसी क्षेत्र मध्ये सात ते आठ हजार उद्योग आहेत. अनेकदा काही परिसरात ट्रांसफॉर्मर, डीपी हे नादुरुस्त होत असल्यामुळे त्याला नियंत्रित करणे गरजेचे आहे.

आधीच महावितरणकडे मनुष्यबळाची कमतरता असून राज्य सरकारने वेळीच महावितरणची दखल घेऊन उद्योगांना शेकडो कोटीचा बसणारा फटका टाळावा. दिवसाच्या सुरुवातीलाच अनेक उद्योग हे विना वीजपुरवठ्यामुळे बंद होते. त्याचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून आले. अशीच परिस्थिती राहिल्यास उद्योजकांना सुद्धा शासनाविरुद्ध आंदोलन उभे करावे लागेल.

- अभय भोर, अध्यक्ष फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य.

दिवसातून चार तास वीज गेली. त्याचा परिणाम उत्पादनावर पडला. चार तास कामगारांना बसून राहावे लागले. त्यांचा चार तासाचा पगार वाया गेला. त्यामुळे उत्पादनाचा तोटा झाला. महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यावर त्यांनी मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगितले. मग; मुंबईतून महावितरणने प्रसिध्दी पत्रकाद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात संप काळात आपत्कालीन वेळेत वीजेची पर्यायी व्यवस्था केल्याचा दावा फोल ठरला.

- संदिप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना.