सासरच्या जाचाला कंटाळून तीन विवाहितांनी संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या तीन घटनांची नोंद चिखली व हिंजवडी पोलिस ठाण्यात झाली.

पिंपरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या तीन घटनांची नोंद चिखली व हिंजवडी पोलिस ठाण्यात झाली. ताथवडे येथे घडलेल्या घटनेप्रकरणी लक्ष्मण शरणप्पा अणकल (रा. बापूजी वस्ती, ताथवडे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मूलबाळ होत नसल्याने तसेच किरकोळ कारणावरून आरोपी विवाहितेला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देत. आरोपीच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी रविवारी रात्री नऊच्या सुमारास स्कार्पच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नेरे येथे घडलेल्या घटनेप्रकरणी पती नवनाथ शिवाजी सरगर (वय 31, रा. एक्‍झरबिया टाऊनशिप, नेरे, मारूंजी), सासू प्रेमल (वय 70), नणंद आशा (वय 35, सर्व रा. मोहननगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मुलीला सासरच्या मंडळींनी घरगुती किरकोळ कारणावरून त्रास दिला. तिच्याशी वाद घालून-पाडून बोलणे, घरात एकटी सोडून निघून जाणे या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उपचारादरम्यान मृत्यू 
फिनेल पिऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना एक फेब्रुवारीला चिखलीत घडली होती. या प्रकरणी आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विवाहितेच्या आईने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आकाश सुनील पाचंगे, सुनंदा सुनील पाचंगे, सासरा सुनील सिद्राम पाचंगे (सर्व रा. घरकुल, चिखली. मूळ रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने एक फेब्रुवारीला फिनेल पिऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. यावेळी माहेर व सासरच्या मंडळींमध्ये रुग्णालय परिसरात वाद झाला. दरम्यान, दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three cases of suicide were registered at chikhali and hinjewadi police stations