मुंबईच्या डबेवाल्यांवर आलीय ही वाईट वेळ, उपासमारीमुळं करावं लागतंय हे काम 

मुंबईच्या डबेवाल्यांवर आलीय ही वाईट वेळ, उपासमारीमुळं करावं लागतंय हे काम 

तळेगाव स्टेशन (ता. मावळ) : मुंबईतील लाखो चाकरमान्यांना रोज न चुकता जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न लॉकडाउनमुळे निर्माण झाला आहे. शाही युवराज्ञी केटला पैठणीची भेट देणाऱ्या या दिलदार डबेवाल्यांवर सध्या पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये रोजंदारीवर काम करण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
               
ब्रिटिशकाळापासून वर्षानुवर्षे मुंबईतील चाकरमान्यांना घरचे डबे पोहोचविण्याचे काम डबेवाले करतात.ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांनी कौतुक केलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांचे नियोजन एक मॅनेजमेंट गुरु म्हणून भल्याभल्यांना चकित करणारे आहे. लॉकडाउनमुळे थिजलेल्या मुंबईतील डबेवाल्यांचे दैनंदिन काम जवळपास चार महिन्यांपासून ठप्प आहे. परिणामी डबेवाल्यांचे पगारदेखील बंद आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील चार हजारांपेक्षा अधिक तरुण मुंबईतील चाकरमान्यांना डबे पोहोचवण्याचे पिढीजात काम करतात. यात खेड तालुक्यासह मावळातील परिठेवाडी, इंगळून, माळेगाव, कल्हाट, कशाळ-भोयरे, कुणे नामा, नागाथली येथील डबेवाल्यांची संख्या लक्षणीय आहे. लॉकडाउननंतर मुंबईत अडकून पडलेले हेच डबेवाले हळूहळू आपपल्या मूळ गावी परतले. मात्र, ग्रामीण भागातही शेतीकामे वगळता सर्व काही ठप्प असल्यामुळे डबेवाल्यांना घरखर्चासाठी रोजगार मिळेना झालाय. लॉकडाउन दरम्यान मुंबईतील सेवाभावी संस्था, डबेवाला संघटनांनी सुरुवातीला मदतीचे किट गावापर्यंत पोहोच केले. त्यानंतर मात्र मदत आलेली नाही.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील चाकण, खेड, तळेगाव, टाकवे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांची धुरांडी जून महिन्यात हळूहळू चालू झाली. मात्र,परप्रांतीय कामगार गावी गेल्यामुळे एमआयडीसीतील उद्योगांना अकुशल कामगारांचा तुटवडा भासत आहे. हाच तुटवडा भरून काढण्याचे काम काही अंशी सध्या गावाकडे असलेले हे मुंबईचे डबेवाले करत आहेत. रोजीरोटीसाठी रोजंदारीवर काम करण्याची वेळ डबेवाल्यांवर आली आहे. आपला कडक टोपी आणि पांढरा शुभ्र पोशाख डबेवाल्यांनी मुंबईतच उतरवून ठेवलाय. एरव्ही मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवणारे हेच हळवे हात रोजीरोटीसाठी सध्या कंत्राटदारामार्फत पुणे जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये अवजड कामावर राबत आहेत. भल्या सकाळी शिदोरी सोबत घ्यायची. पिकअप गाडीत बसून, थेट कंत्राटदाराने सांगितलेली एमआयडीसीतील कंपनी गाठायची. तीनशे ते चारशे रुपये रोजावर काम करायचे. त्यातले गाडीभाड्याचे देऊन जेमतेम तीनशे-साडेतीनशे रुपये हाती पडतात. त्यावरच सध्या कुटुंबाची गुजराण चालू आहे. बहुतांश डबेवाल्यांचा हा दिनक्रमच झालाय जणू. लॉकडाउनमध्ये सरकारने सर्व घटकांना मदत केलीय. मात्र, देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरीच्या तोंडी घरच्या जेवणाचा घास घालणारा हा डबेवाला अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन किती दिवस चालेल माहिती नाही. कोरोनामुळे मुंबईत जाणे पुढील काही महिने सुरक्षित नाही. गावाकडे येऊन आम्ही भुईला भार होऊ इच्छित नाही. आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने गावाकडे मिळेल ते काम करत असल्याचे परिठेवाडीतील डबेवाला तरुण शिवाजी करांडे याने सांगितले.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डबेवाल्याच्या कुटुंबियांना सरकारने भरीव मदत करावी. डबेवाल्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये शासकीय मदतीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. मात्र निर्णय अद्याप झालेला नाही, असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com