रेवस-रेडी रस्त्यासाठी पायलिंग टेस्ट सुरू
मुरूड, ता. १४ (बातमीदार) : कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या रेवस-रेडी सागरी महामार्गाच्या पायलिंग टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी या रस्त्यासाठी अर्थसंकल्पात ३५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी रेवस-रेडी रस्त्याची संकल्पना आखली होती; मात्र आता ते स्वप्न साकार होणार आहे. समुद्रमार्गे जाणाऱ्या या रस्त्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे. हा रस्ता बांधण्यासाठी खासदार सुनील तटकरे झटत आहेत. अखेर त्यांच्याच पाठपुराव्याने निधी मंजूर झाला आहे.
रेवस ते करंजा पूल बांधण्यात येणार आहे. नांदगाव परिसरात तीन ठिकाणी ही पायलिंग टेस्ट करण्यात येणार आहे. मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील नागेश्वर नगर ते नवीन मजगाव या ठिकाणी तीन किलोमीटरचा मोठा पूल बांधण्यात येणार असून सदरचा मार्ग या मार्गाला बाहेरच्या बाहेर जोडण्यात येणार आहे. रेवस-रेडी प्रकल्पाचे पायलिंग टेस्टिंग हे पहिले काम असून त्याची सुरुवात करण्यात आली आहे.
चौकट
पायलिंग टेस्ट म्हणजे काय?
उंच पूल बांधताना जमिनीची पायलिंग टेस्ट केली जाते. यंत्राच्या साह्याने १०० फूट खोल जमिनीच्या आत सापडणाऱ्या वस्तूंची प्रयोगशाळेत तपासणी होते. यामुळे मोठे पूल बांधताना जमीन भार सहन करेल का, यासाठी ही चाचणी महत्त्वाची समजली जाते. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत हे काम केले जाते.