विहूर किनारी कच्छ वनस्पती, तिवरांची कत्तल
मुरूड ता. १८ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यातील मौजे विहूर येथील जागेतील कच्छ वनस्पती, तिवर झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याप्रकरणी विहूर ग्रामस्थांनी एक निवेदन मुरूड तहसीलदार रोशन शिंदे यांना नुकतेच दिले. किनारपट्टीवरील २०० मीटरपर्यंतच्या क्षेत्रास किनारा नियमन कायदा लागू आहे. तिवरचे क्षेत्र भू-बंदिस्त केले जात आहे. किनाऱ्यानजीकच्या तिवरांची कत्तल करून मातीचा भराव टाकण्यात आला आहे. याशिवाय गेल्या सहा महिन्यांत समुद्री शेवाळ, गवत उखडण्यात आले आहे. विहूर ग्रामपंचायतीने बेकायदा अतिक्रमण थांबवण्यासाठी संबंधितांना नोटिसा दिल्या आहेत, परंतु जिल्हा प्रशासन, एमटीडीसी, वन विभाग मुरूड आणि मेरिटाइम बोर्ड प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या भागातील तीन ते चार एकर जमिनीवरील तिवरे तोडण्यात आली आहेत. भरतीरेषा ओलांडून किनारी भागात अतिक्रमण झाल्याचे याआधीच्या तक्रारीत ग्रामस्थांनी म्हटले होते.
...
माशांच्या प्रजननांवर परिणाम
आता त्या ठिकाणी मोठमोठे लोखंडी पोल उभे करण्यात आले आहेत. समुद्र किनारी असे काम करताना किनारा नियमन कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. भरती-ओहोटी रेषेत जवळपास ८० टक्के मासे आढळतात. या ठिकाणी असलेले समुद्री सी-ग्रास व तिवर झाडे नष्ट केल्यामुळे माशांचे प्रजनन, अधिवास आणि समुद्र जीवसृष्टी धोक्यात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सर्व यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पर्यावरणाचे एवढे मोठा नुकसान होऊन केवळ वेळकाढूपणामुळे पुरावे नष्ट करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे.