मुरूड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी
कामावर रुजू करण्यासाठी प्रवासी संघटनेचा पुढाकार
मुरूड, ता. २२ (बातमीदार) : येथील आगारातील वाहक-चालकांनी प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून
लवकर कामावर रुजू व्हावे, असे आवाहन मुरूड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी केले. आगार व्यवस्थापकांनीही या बाबींकडे लक्ष द्यावे आणि प्रवासी सेवा पूर्ववत करावी, असे आवाहन केले.
मुरूड आगारातून मुरूड-पनवेल ही एकच बस सुटते. आगारातील कर्मचारी संपावर असल्याने ही परिस्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ते थांबवावेत, यासाठी सुर्वे प्रयत्न करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात कर्मचारी विलीनीकरणाचा प्रस्ताव न्यायप्रविष्ट आहे. या खेरीज खुद्द परिवहन मंत्र्यांनी न्यायालयाचा निर्णय सरकारला मान्य असेल, याची हमी दिली आहे.
यासाठी न्यायालयाच्या निकालापर्यंत कर्मचाऱ्यांनी अनुपस्थित राहणे योग्य ठरणार नाही, असे सुर्वे म्हणाले. सुर्वे यांनी मुरूड आगारातील आगार व्यवस्थापक सुनील वाकचौरे यांची भेट घेऊन कर्मचारी कामावर हजर होण्यासाठी आपणाकडून सुद्धा प्रयत्न होणे खूप गरजेचे असल्याचे सांगितले.
त्यावर आगार प्रमुख वाकचौरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना भेटून विनंती केली. मात्र प्रतिसाद नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मुरूड आगारातील तीन कर्मचाऱ्यांवर बडतर्फ का करू नये, २१ जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याची माहिती देत ५५ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले; तर १४ जणांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
ज्यांच्यावर प्रशासनाची
कोणतीच कार्यवाही झालेली नाही अशा कर्मचाऱ्यांनी तरी लवकर कामावर हजर होऊन प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा, अशी भावनिक साद सुर्वे यांनी घातली आहे.