सोळांकूर
02658
सहकार पंढरीचा वारकरी
समाजकारण व राजकारणात ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, विविध स्तरांतील लोकांच्या समस्यांचे निराकरण केले, राधानगरी तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून तालुक्याला सहकार पंढरीचे स्वरूप दिले, असे राधानगरीचे लोकनेते व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त..
-एस. के. पाटील, सोळांकूर.
राधानगरी तालुक्यात पूर्वी राजकीय शक्तीवर एका नेत्याची, गटाची पकड नव्हती. गटाअंतर्गत एकवाक्यता नव्हती. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस संघटनेला फारशी किंमत नसायची. कुणीतरी नेत्याच्या मागे फरफटत जायचे, प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका घ्यायची; पण १९९५ च्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ए. वाय. पाटील या राजकारणात नवख्या असलेल्या युवा नेत्याने विजय मिळवला. त्यामध्ये तालुक्यातील विविध विभागांचे काँग्रेसचे गट, पुरोगामी पक्षाचा पाठिंबा यामुळे विजय झाला. त्या निमित्ताने त्यांनी संपर्क वाढवून त्यांनी विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एका छत्राखाली येण्याचे आवाहन केले. सामुदायिक नेतृत्व विकास त्यांनी दाखवला. उपेक्षित कार्यकर्त्यांना ताकद दिली. यामध्ये अभेद्य कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण झाली. त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर अनेक सत्तास्थाने मिळविली आणि त्यातून निर्माण झाले ए. वाय. नावाचे झंजावात. एक तगडं राजकीय नेतृत्व !
प्रचंड जनसंपर्क त्यांची शक्ती आहे. सोळांकूर येथील त्यांचे घर आणि विठ्ठल विकास संस्थेचे कार्यालय सतत कार्यकर्त्यांच्या आणि वेगवेगळ्या कामांसाठी येणाऱ्या माणसांनी गजबजलेले असते. कोणत्या माणसाने किती वेळ द्यायचा, कोणावर कोणते काम सोपवायचे, तसेच स्वतःला झोकून काम करायचे, याची त्यांना जबरदस्त जाण आहे. सहकारी व कार्यकर्त्यांना सन्मान देणारे ए. वाय. पाटील शासकीय अधिकारी व विरोधी पक्षनेते यांना आदराची व आपुलकीची वागणूक देतात. कार्यकर्ते हेरून त्यांना मार्गदर्शन करणे, अडीअडचणीत त्यांना दिलासा देणे, विधायक कार्यात ताकद देणे या गोष्टीचा त्यांना छंद आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे त्यांच्या अंगी जबरदस्त कौशल्य आहे. सततच्या संघर्षामुळे विरोधक वाढले तर सारी शक्ती राजकीय शत्रूंचा बंदोबस्त करण्यात खर्ची पडते. त्यापेक्षा विरोधकांशी सुसंवाद ठेवणे, त्यांच्या कामाला प्राधान्य देणे यामुळे अनेक पारंपरिक विरोधक चटकन आपलेसे करून घेण्यात निष्णात आहेत. नेतृत्वाला करिष्मा टिकवण्यासाठी आपल्यामागे ठामपणे उभे असलेल्या पडत्या काळात साथ देणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांना या उमेदीच्या काळात पाठबळ देत आहेत. राजकीय परिपक्वता असलेले ए. वाय. भविष्याची चाहूल, काळाची गरज ओळखून निर्णय घेतात. तळमळीने निर्णय अमलात आणतात म्हणूनच ते देदीप्यमान यश संपादन करतात.
सामाजिक संवेदना, तरलता, राजनीती कौशल्य, संभाषणातील चातुर्य, नव विचार प्रस्तुत करण्याची आणि नव्या संकल्पना राबविण्याची क्षमता त्यांच्या अंगी आहे. काळानुरूप ते चांगले वक्तेही बनू लागले आहेत. श्रोत्यांच्या थेट काळजाला जाऊन भिडेल असे विचार साध्या, सोप्या, रांगड्या पद्धतीने ते मांडतात.
राजकारणाव्यतिरिक्त समाजकारण, सांस्कृतिक चळवळी, शिक्षण संस्थांशी त्यांचा थेट संपर्क आहे. गावागावातील तरुण त्यांच्या नावाने विचार मंच स्थापन करत आहेत. ते स्वतः वारकरी असल्याने त्यांच्या वैष्णव पंथीय प्रवचन, कीर्तन वारीतून सतत संपर्क येतो. अनेक महाप्रसादाला ते तन-मन-धनपूर्वक मदत करतात. त्यांची स्वतःची कर्तृत्व भरारी जनसामान्यांच्या मनात आहे. जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण, सहकारी विश्वात त्यांची सतत उठबस आहे. तालुक्यातील राजकारण अढळ ध्रुवासारखे आहे.
ए. वाय. पाटील सोळांकूर येथील सामान्य कुटुंबात जन्मले. वडील यशवंत पाटील यांची लोकाभिमुखता आणि सासरे परशुराम पाटील यांचा आशीर्वाद, आमदार के. पी. पाटील यांचे पाठबळ, बंधू आर. वाय. पाटील यांचे बळ, पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांची सोबत, अमित व अवि ही कर्तृत्ववान मुले, रक्ताचं पाणी करणारी राधानगरीची रांगडी जनता यामुळेच त्यांचे नेतृत्व घडले, हे ते नेहमी विनम्रपणे कबूल करतात.
(पुरवणी संकलन - एस. के. पाटील)
चौकट
ग्रामीण भागाचा चेहरामोहरा
बदलण्याचा मौलिक वाटा
विविध राजकीय खेळी करताना समाजाच्या विकासाचा आराखडा विसरून चालत नाही, हे त्यांच्या ध्यानात आले. केवळ सहकारात न रमता गावोगावी रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, दळणवळणाच्या मूलभूत सुविधा गावाच्या वेशीपर्यंत, मतदारांपर्यंत घरात पोहोचल्या पाहिजेत यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. पाणी योजना, आरोग्य केंद्र, रस्ते, बंधारे, शाळा इमारती बांधण्याचा त्यांनी सपाटा लावला. त्यावर आधारित तालुक्याचे मागासलेपण घालवून तालुक्याच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांचा मौलिक वाटा आहे. विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यात यशस्वी झालेले ए. वाय. यांचे जनसामान्यात अनन्यसाधारण स्थान आहे. लोकशाही नेते आणि राजकीय लोकांना मतासाठी जीवघेणी स्पर्धा करावी लागते आणि त्यांचे नेतृत्व या संघर्षातून वाढले, बहरत गेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.