नगराध्यक्षांसह सात नगरसेवकांना ‘कारणे दाखवा’

नगराध्यक्षांसह सात नगरसेवकांना ‘कारणे दाखवा’

तळेगाव स्टेशन, ता. ६ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील स्टेशन विभागातील तळ्यामधील गाळ, माती, मुरूम लोक सहभागातून काढण्याच्या कामात मोठया प्रमाणावर खर्च झाल्याबाबत नगरविकास विभागाने तत्कालीन सात नगरसेवकांसह नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, पंधरा दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नगरसेवक संग्राम काकडे, संदीप शेळके, अरुण भेगडे, विभावरी दाभाडे, अमोल शेटे, संध्या भेगडे, शोभा भेगडे यांच्यासह नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना गुरुवारी (ता. ६) महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी महेश हंशेट्टी यांनी ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना अनियमितता आणि गैरवर्तन केल्याबाबत कलम ५५ (अ व ब) अन्वये कार्यवाही करण्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेच्या कार्यपद्धतीबाबत खात्री न करताच निविदेस मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू असताना कामाचा सविस्तर आढावा घेतला गेला नाही. तसेच, मंजुरीप्रमाणे कामकाज झाले किंवा नाही याची शहानिशा केली गेली नाही. संबंधित ठराव मंजुरीबाबत शासन अधिनियमानुसार कार्यवाही पार पाडण्यात आली नाही. तसेच, निविदेबाबत खात्री न करताच मंजुरीसाठी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. नगरपरिषदेने दोन लाख ३७६ ब्रास माती, मुरूम उत्खनन करून वापर आणि विक्री केल्याचे सिद्ध होत असल्याने या मालाची रॉयल्टी व दंड मिळून ७९ कोटी ६४ लाख ९४ हजार ६०० रुपये इतकी रक्कम सरकारला जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यास जबाबदार असल्याबाबतचा ठपका या नोटिशीद्वारे ठेवण्यात आला आहे. १५ दिवसांत खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील उचित कार्यवाही करण्याचा इशारा नोटीस दिला गेला आहे. नेमका नगराध्यक्षा आणि नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्याच्या दिवशीच ही नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी पालिका प्रशासनाचा अथवा कोणत्याही इतरस्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अपात्र का ठरवू नये, असा जाब नोटिशीत विचारण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com