चवदार तळ्याच्या पाणी शुद्धीकरणाला सुरुवात
समाज कल्याण विभागाकडून सव्वा कोटी रुपयांचा निधी
महाड, ता. २३ (बातमीदार) : येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाणी शुद्धीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाने यासाठी एक कोटी ३७ लाखांचा निधी देण्यात आला होता.
महाड शहरात २२ जुलैला महापूर आला होता. या वेळी चवदार तळ्यात गाळ आणि कचरा साचून पाणी दूषित झाले. यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ्याची पाहणी केली होती. त्यांच्या आदेशानंतर तळ्यातील पाण्याचा उपसाही करण्यात आला होता. आता राज्याच्या समाज कल्याण विभागाने तळ्यातील पाणी शुद्धीकरण प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधत शुद्धीकरण कामासाठी एक कोटी ३७ लाखांचा निधीही महाड पालिकेला दिला आहे.
जलशुद्धीकरणाचे काम ऑरगॅनिक बायोटेक या कंपनीला दिले असून पाच वर्षे हे काम सुरू राहणार आहे. १५ दिवसांत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे, अशी माहिती पालिकेचे नगर अभियंता सुहास कांबळे यांनी दिली.
…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केलेल्या चवदार तळ्याचे पाणी शुद्ध केले जात आहे. ही चांगली बाब आहे. यामुळे येथे येणारे अनुयायी नक्कीच समाधान व्यक्त करतील.
- मनोज साळवी, नागरिक.
..................
दृष्टिक्षेप
- चवदार तळे जलशुद्धीकरण प्रक्रिया ‘लाँग डिस्टन्स सर्क्युलेशन’द्वारे होणार आहे.
- हे यंत्र सौरऊर्जेवर चालणार
- सक्शन पंपाद्वारे पाणी दूषित पाणी जैविक प्रणालीद्वारे शुद्धीकरण करणार
…
असे आहे तळ्याचे महत्त्व
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात ऐतिहासिक चवदार तळे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी या ठिकाणी सत्याग्रह केला होता. यामुळे हे ठिकाण जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. तळ्याचे अंदाजे क्षेत्रफळ २.५ एकर आहे. डॉ. आंबेडकर यांनी असंख्य अनुयायांसोबत या तळ्यातील पाणी प्राशन करून हा पाणवठा सर्वांसाठी खुला करून दिला. या सत्याग्रहामुळे सामाजिक समतेचे रणशिंग फुंकले गेले.