थेरगावात दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेरगावात दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला मारहाण
थेरगावात दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला मारहाण

थेरगावात दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला मारहाण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करण्यात आली. हा प्रकार थेरगाव येथे घडला. व्यंकटेश सुरेश नाईक (रा. जयहिंद कॉलनी, भारतमाता चौक, नढेनगर, काळेवाडी ) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मितेश ऊर्फ बाबू कदम (रा. पडवळनगर, थेरगाव ) व चिऱ्या ऊर्फ अक्षय पासलकर (रा. थेरगाव गावठाण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना शनिवारी (ता. १) रात्री अकराच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी यांना नवीन वर्षाची पार्टी करण्यासाठी गाडीवरून थेरगावातील जगतापनगर येथील स्मशानभूमीजवळ घेऊन गेले. येथे दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात आरोपींनी फिर्यादी यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यात ते जखमी झाले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून,पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चिखलीत ४७ हजारांची रोकड लंपास
दुकानात ठेवलेल्या पर्समधील पन्नास हजारांची रोकड अज्ञात महिलेने चोरली. ही घटना चिखलीतील मोरे वस्ती येथे घडली. शाईन बालम शेख (रा. मैत्रेय हौसिंग सोसायटी, टॉवर लाईन, मोरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे मोरेवस्ती येथील टॉवर लाइन येथे कपड्याचे दुकान आहे. या दुकानाच्या काउंटरच्या खाली फिर्यादी यांनी त्यांची पर्स ठेवली होती. त्यामध्ये ४७ हजारांची रोकड होती. ही पर्स अनोळखी महिलेने चोरली. याप्रकरणी चिखली पोलिस गाठण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

कासारवाडीत पाइप चोरल्याप्रकरणी गुन्हा
मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी ठेवलेले लोखंडी पाइप चोरल्याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार कासारवाडी येथे घडला. सचिन बबन कापसे (वय ३३, रा. वैशालीनगर, पिंपरी) व दादासाहेब बापूराव कोल्हे (वय ३७, रा. नाणेकर चाळ, पिंपरी स्थानकाजवळ, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बसवराज माधव टोपारे (रा. माण) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी कासारवाडी येथे अल्फा लावल कंपनीच्या गेट क्रमांक चार समोर मेट्रोसाठी काम करीत असलेल्या ठिकाणी बिल्डिंग मटेरियलचे लोखंडी लेजर पाइप ठेवले होते. दरम्यान, आरोपींनी येथून पाच हजार सहाशे रुपये किमतीचे सात पाइप चोरले. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हिंजवडीत भाजी मंडईतून मोबाईल चोरीला
मंडईत भाजी खरेदी करीत असताना ग्राहकाचा मोबाईल चोरीला गेला. ही घटना हिंजवडी येथे घडली. श्रीहर्ष पदमकिशोर उंटवाल (रा. भाटेवारा नगर, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे रविवारी (ता. २) सकाळी दहाच्या सुमारास विनोदे वस्तीतील विनोदे कॉर्नर येथील भाजी मंडईत भाजी खरेदी करीत होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या खिशातील पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

शहरात वाहन चोरीच्या तीन घटना
हिंजवडी, एमआयडीसी भोसरी व वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या तीन घटना घडल्या. या वेगवेगळ्या घटनांमध्ये दीड लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्या. अभिषेक अपूर्व कुमार कुंडू (रा. ब्लुरिज सोसायटी, फेज १, हिंजवडी) यांचे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे वाहन सोसायटीच्या पार्किंगमधून चोरीला गेले. हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रशांत मोहन पांढरपट्टे (रा. थेरगाव रोड, थेरगाव) यांची पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी मोशीतील इंद्रायणीनगर येथील एचडीएफसी बॅंकेसमोरून भरदुपारी चोरीला गेली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरीपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तिसरी घटना थेरगाव येथे घडली. शशिकांत माधवराव मिरकले (रा. पडवळनगर, पवार कॉलनी, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मामाच्या
नावावर असलेली पंधरा हजारांची दुचाकी थेरगाव येथील वेणूनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चोरीला गेली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top