किशोरवयातील रग बेततेय जिवावर

किशोरवयातील रग बेततेय जिवावर

पिंपरी, ता ३ : क्षणिक राग, वर्चस्व निर्माण करण्यासाठी निर्माण झालेली स्पर्धा, अतिउत्साह यातून किशोरवयातील मुले चुकीची पावले टाकतात. यातून ते गुन्हेगारीकडे वळत असून त्यांच्यातील रग स्वतःसह इतरांच्याही जिवावर बेतत आहे, असा निष्कर्ष पोलिसांचा आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसात घडलेल्या खुनाच्या गंभीर घटनेसह इतर घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे दिसून आल्याने बाल गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

पोलिसांच्या मते, मुलगा किशोरवयात आल्यानंतर आई-वडील त्याच्या करिअरचे स्वप्न रंगवतात. उच्च शिक्षण, नोकरी याबाबतचे नियोजन केले जाते. यासाठी पालकांचे सुरुवातीपासूनच आपल्या मुलांवर लक्ष असायला हवे. दरम्यान, मुलांकडे दुर्लक्ष झाल्यास, त्याला चुकीच्या मित्रांची संगत मिळाल्यास तसेच घरातील वातावरणासह सोशल मीडियामुले मुले बिघडतात. विविध पोलिस ठाण्यात दाखल होत असलेल्या चोरी, लूटमार, हाणामारी यासारख्या गुन्ह्यातही अनेक अल्पवयीन आरोपी आहेत.

आयुक्तालयाच्या हद्दीत मागील पंधरा दिवसात अशाप्रकारच्या दोन-तीन घटना घडल्या. केवळ दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अवघ्या १४ व १७ वर्षीय मुलांनी एकाचा खून केला. यामध्ये दोन मुले आरोपी तर झालेच शिवाय एका व्यक्तीचे कुटुंबही उध्वस्त झाले.

तळेगाव दाभाडे येथे दहा दिवसांपूर्वी एका सतरा वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना समोर आली. यामधील मृत युवकाने काही दिवसांपूर्वी त्याच्या मोबाईलचा स्टेट्स ३०२ शंभर टक्के असे ठेवले होते. तसेच हल्लेखोर व मृत युवक यांच्यात काही दिवसांपूर्वी वादही झाला होता. दरम्यान, मृत युवकाने ठेवलेल्या स्टेट्समुळे हल्लेखोरांना भीती होती. यातून हल्लेखोरांनी युवकाचा निर्घृण खून केला.

पिंपळे गुरवमध्ये भरदिवसा सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याच्या घटनेतही अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. अशा गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांच्या सहभागाची बाब चिंताजनक आहे.
-----------------------
व्यसनाधीनतेचा परिणाम
अवघ्या बारा, तेरा वर्षांची मुले व्यसनाकडे वळत आहेत. व्यसनासाठी पैसे मिळविण्यासाठी मुले गुन्हेगारीकडे वळतात. चोरी, लूटमार यासह एखाद्याचा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. यासह व्यसन केल्यानंतरही काही मुले चुकीचे पाऊल टाकून गुन्हा करतात.
-----------------------------
ग्लॅमर, प्रसिद्धीचा हव्यास
मुलांना ग्लॅमर, प्रिसिद्धी हवी असते. यासाठी काहीही करण्यासाठी ते तयार असतात. मात्र, आपल्या हातून घडणाऱ्या घटनांची पूर्ण समज नसते, त्याचे परिणाम काय होतील, याचेही गांभीर्य नसते. यातून गंभीर घटनाही घेतात.
--------------------------------------------------------------------------------
* कारणे
- बदलती लाइफस्टाइल
- महागड्या गाड्यांचे आकर्षण
- बेरोजगारी
- आर्थिक जबाबदारीमुळे पालकांचा मुलाशी अपुरा संवाद
- एकतर्फी प्रेमभावना
- तुलना करणे,
- विध्वंसक, मत्सरी वृत्ती
- आर्थिक, सामाजिक परिस्थिती,
- श्रीमंतीचा हव्यास,
- मुलांना आधार वाटेल अशा चुकीच्या गोष्टींना पाठिंबा
- मुलांच्या वयाचा, धाडसाचा स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी उपयोग करून घेणारी सामाजिक व्यवस्था
- भावनिक असमतोल
--------------------
हे करणे आवश्यक
मुलांमध्ये वाढत असलेली हिंसा, उद्धटपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती
रोखण्यात सर्वांत महत्त्वाचे काम पालकांचे असते. मुलांशी संवाद आवश्यक आहे. मात्र, एकत्र कुटुंब पध्दतीचा ऱ्हास होत असून, मुलांचे संगोपन कसे करायचे याचेच आव्हान पालकांसमोर निर्माण होत आहे. मुलांच्या प्रवृत्तींमध्ये बदल होत असल्याने याची जबाबदारी सर्वप्रथम पालक, शिक्षक, नातेवाईक व नंतर सर्व समाजावर येते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणाऱ्या गैरवापरावर अंकुश लावण्याची जबाबदारी पालकांना पार पाडावी लागेल, असेही पोलिसांचे मत आहे.
---------------
प्रत्येक मुलाची मानसिकता वेगळी असून, त्याचा सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा. पालकांनी सतत सजग असायला हवे. पालकांचा मुलांशी संवाद आवश्यक आहे. मुलांमधील बदल वेळीच ओळखावेत. गुन्हेगार हे आजारी व्यक्तीसारखे असतात. त्यांच्यावर उपचार व्हायला हवेत. त्यांना वाळीत टाकायला नको.
- वंदना मांढरे , समुदेशक.
--------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com