राहण्यायोग्य मोशी

राहण्यायोग्य मोशी

विकसनशील मोशी

पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी अशा पाच गावांचा समावेश करून १९७२ मध्ये अस्तित्वात आलेले नगर म्हणजे पिंपरी-चिंचवड. ग्रामपंचायती जाऊन नगरपालिका असस्तित्वात आली. आणि नावाप्रमाणेच नगरात नागरीकरण वाढू लागले. कंपन्या वाढल्या. त्यावर आधारित लघुउद्योग आले. कामगारांची संख्या वाढली. त्यामुळे कामगारनगरी, उद्योगनगरी असे नामाभिधान मिळाले. पुढे १९८२ मध्ये आजूबाजूची गावे समाविष्ट करून महानगरपालिका अस्तित्वात आली. त्यात आणखी लगतची १८ गावे १९९७-९८ मध्ये समाविष्ट केली. त्यात पुणे-नाशिक महामार्गावरील आणि देहू-आळंदी रस्त्यावरील मोशीचाही समावेश होता. त्यामुळे मोशीचे गावपण जाऊन शहरीपण आले. आता तर महानगराचे एक महत्त्वाचे उपनगर अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. पण, आजही गावपण टिकून आहे. त्यामुळे गाव आणि शहर या दोन्ही संस्कृतीचा मिलाप म्हणजे मोशी आहे.

जमिनीनींना सोन्याचे भाव...
टेल्को, बजाज, गरवारे आदी मोठे उद्योग आणि त्यावर आधारित छोटे उद्योगधंदे यामुळे या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर कामगारांचे उद्योगनगरीकडे पाय वळले. त्यामुळे त्यांच्या राहण्यासाठीच्या घरांचाही मोठा प्रश्‍न निर्माण होऊ लागला. त्यासाठी बैठी घरे, चाळी उभ्या राहू लागल्या. आता सदनिका असलेल्या टोलेजंग इमारतीही उभ्या राहू लागल्या आहेत.

मोशीगावचा विकास...
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये १९९७-९८ मध्ये मोशीचा समावेश झाला अन् गावचा कायापालट झाला. पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावर अस्सल ग्रामीण बाज असलेले वसले आहे मोशी गाव. नागा साधूंच्या झुंडींबरोबर आलेले अन् हा परिसर आवडल्याने मोशीतच वास्तव्य केलेले श्री नागेश्‍वर महाराज यांच्या समाधीस्थळाने पुनीत झालेले हे मोशी गाव सर्वश्रुत आहे. त्यातच पूर्वेला संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांचे संजीवन समाधी असलेले तीर्थक्षेत्र आळंदी तर पश्‍चिमेला जगद्‌गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबा महाराज यांचे वैकुंठगमन तीर्थक्षेत्र देहू यांची साथ लाभल्याने मोशीगाव महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध झाले. कारण या दोन्ही तीर्थक्षेत्रांकडे जाण्यासाठी फक्त येथून जावे लागत असे. सुजलांम सुफलांम प्राधिकरणातील समावेशामुळेच मोशीचे नाव कोरले गेले जगाच्या नकाशावर कोरले गेले. ग्रामपंचायत काळापासून ते महापालिकेमध्ये समावेश झाला तरी अद्यापिही मुबलक शेती शिल्लक असल्याने आजही बैलपोळा यांसारखे विविध सण साजरे करताना आणि ग्रामदैवत श्री नागेश्‍वर महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने लोकनाट्य तमाशाला, कुस्त्यांचा आखाडा, भंडाऱ्यामधून उठणाऱ्या हजारोंच्या पंगती अन् पवित्र अशा मानाच्या विड्यासाठी लाखोंची बोली लावून तो विडा घेणे ही वैशिष्टे जपत आजही आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन करत आहेत हे मोशीकर.

नवनगर विकास प्राधिकरण
पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत असल्याने येथील कामगारांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या निवासासाठी उत्तम व्यवस्था होणे आवश्‍यक होते. म्हणून पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार १४ मार्च १९७२ रोजी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाच्या माध्यमातून निगडी, भोसरी, मोशी, चिखली आदी ठिकाणी नवनगर विकासासाठी जमिनींचे संपादन करण्यात आले. संपादित केलेल्या जमिनींचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास करण्यात आला. विकसित केलेले भूखंड निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी ते उपलब्ध करून देण्यात आले. या प्राधिकरणामध्येच मोशी गावचा समावेश झाला अन मोशी गावचा न भूतो न भविष्यती असा विकास झाला.

प्राधिकरणामुळे विकास
मोशी उपनगराचा समावेश पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये झाला. मोशीच्या उत्तरेकडील मोठा भाग यामध्ये समाविष्ट झाल्याने या भागाचा अद्वितीय असा विकास झाला. दळणवळणासाठी पंचेचाळीस मीटर एवढ्या रुंदीचा प्रशस्त स्पाईन रस्ता, अंतर्गत वाहतुकीसाठी पंधरा मीटर, चोवीस मीटर ते तीस मीटर पर्यंतचे रस्ते आणि पाच ते पंचवीस गुंठ्यांचे भूखंड आणि विविध पेठा पाडून नियोजनबद्ध विकास करण्यात आला. राज्य आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निवास योजना ते कामगारांसाठी भूखंडांचे लॉटरी पद्धतीने वाटप करत नियोजित विकास पिण्याच्या पाण्यासाठी लाखो लिटर क्षमता असलेले जलकुंभ तर सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी अंतर्गत सांडपाणीवाहिन्यांमुळे मोशी प्राधिकरणाचा सुंदर असा विकास झाला.

प्रकल्पांमुळे जगाच्या नकाशावर...
शहरातील विविध उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण व्हावी, विविध देशांतील उत्पादने आपल्या देशात यावीत या उद्देशाने येथील मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहामध्ये सुमारे २०० एकर भूंखंडावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभे राहत आहे. यामध्ये भव्य प्रदर्शन दालने, व्यापारी संकुले, पंचतारांकित हॉटेल्स, हेलिपॅड आदी उच्च दर्जाच्या वास्तू असलेल्या याच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामुळे तर मोशी उपनगराचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले.

मोशीचे आकर्षण...
पेठ क्रमांक चार, सहा व नऊमध्ये ट्रॅफिक पार्क, जिल्हा मध्यवर्ती केंद्र, बास्केट बॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, हॉलीबॉल कोर्ट, मिनी हॉकी कोर्ट आदी अद्ययावत क्रीडांगणे आणि क्‍लबहाऊस दिमाखात उभे आहेत. मध्यवर्ती सुविधा केंद्रातील नाले व तळ्यांचे सुशोभीकरण. शहराचे वैशिष्ट्ये असलेल्या स्पाईन रस्त्यालगत भव्य मॉल, व्यापारी संकुले, चित्रपटगृह, गगनचुंबी अद्ययावत ईकोफ्रेंडली गृहप्रकल्प आदी कारणांमुळेच आणि स्वच्छ, मोकळी आणि ताजी हवा यामुळे नागरिकांची पावले मोशीसह मोशी प्राधिकरणाकडे राहण्यासाठी वळाली नाही तर नवलच.

स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण
पिंपरी-चिंचवडकरांसह तमाम शिव-शंभू प्रेमींच्या अभिमानाची बाब असलेला ‘स्टॅच् ऑफ हिंदुभूषण’ अर्थात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून मोशी येथे शंभूसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. मोशी- बाऱ्हाडेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा तब्बल १४० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याचे काम दिल्ली येथील कार्यशाळेत सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा चौथरा ४० फूट असून, पुतळ्याची उंची १०० फूट इतकी असणार आहे. जागतिक किर्तीचे शिल्पकार राम सुतार आणि प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.

असा असेल स्टॅच्यू
- छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची : १४० फूट
- चौथऱ्यांची उंची : ४० फूट
- एकूण परिसर : सुमारे ३ एकर
- ठिकाण : मोशी- बोऱ्हाडेवाडी, पिंपरी-चिंचवड.
- सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा : १० फूट
- सरदार आणि मावळे एकूण १६ पुतळे : १० फूट
- पुतळ्याच्या आवारात ओपन एअर थिएटर
- प्रमुख प्रसंगांवर आधारित ब्राँझ म्यूरल्स
- शंभुराजांची गाथा ऐकण्यासाठी ४० बाय २० फूट एल.ई.डी. स्क्रीन
- चलचित्र आणि प्रकाश योजना
- शंभूराजांचे हॉलोग्राफिक प्रेझेंटेशन व्यवस्था
- रंगमंचाच्या दोन्ही बाजूस कंट्रोल रुम
- पुतळ्याचा सांगाडा एसएसमध्ये होणार.
- पुतळ्याच्या आतमध्ये लिफ्ट असेल. त्यामुळे मेंटनन्स करता येईल.
- सुमारे १००० वर्षे पुतळा सुस्थितीत राहील, असा कामाचा दर्जा ठेवण्याचा संकल्प आहे.

मोशीच का?
- आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलेले उपनगर
- कृषी उत्पन्न उपबाजारामुळे भाजीपाला व किराणा मालाचा घाऊक बाजार
- मोशी प्राधिकरणातील जागेवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ
- श्री नागेश्‍वर महाराज समाधी मंदिरामुळे पौराणिक व ऐतिहासिक स्थान
- संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तीर्थक्षेत्र देहू व आळंदीचे सानिध्य
- तीर्थक्षेत्र आळंदी व देहू पायी वारी मार्गावरील महत्त्वाचा टप्पा
- तीर्थस्थान इंद्रायणी नदीच्या कुशीत वसलेले टुमदार गाव आता शहर होतंय
- स्वच्छ सुंदर, नयनरम्य व काही प्रमाणात कृषी क्षेत्र असल्याने शुद्ध हवा
- सुनियोजित विकास, प्रशस्त रस्ते, मुबलक पाणी, वीज, बाजारपेठेची सुविधा
- पुणे-नाशिक महामार्गावरील महत्त्वाचे गाव
- झपाट्याने विकसित होत असल्याने अत्याधुनिक बंगलो ते गगनचुंबी टॉवर उभे राहात आहेत
- व्यायामप्रेमींसाठी रहदारीमुक्त रस्ते, उद्याने, क्रीडांगणे...
- पोलिस चौकी, महापालिका दवाखाना, महापालिका व अन्य खासगी शाळा
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com