
दापोडीत रोहित्र चक्क जमिनीवरच
जुनी सांगवी, ता. २२ ः दापोडीतील बॉम्बे कॉलनी येथे एका बांधकामाच्या जागेत महावितरणचा रोहित्र चक्क जमिनीवर आहे. याचे खांब गंजलेल्या आणि वाकलेल्या अवस्थेत आहेत. परिसरात झाडे गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खांबांवर वेलींना विळखा पडला आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्यावर असलेले रोहित्र तसेच विजेच्या खांबांवरील केबलचा धोका कमी करण्यासाठी संपूर्ण शहरांमध्ये महावितरणच्या वतीने भूमिगत केबलची कामे सुरू आहेत. या भूमिगत केबलसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, दापोडीतील बॉम्बे कॉलनीमध्ये एका बांधकामाच्या कोपऱ्यात असलेल्या खांबांवरील विद्युत रोहित्र जमिनीवर उघड्यावर आहे. या विद्युत रोहित्र सभोवताली बांबूचे तात्पुरते कुंपण घालण्यात आले आहे. रोहित्राच्या खांबाला लागून काही फुटांवरच एका पत्र्याच्या शेड मध्ये गेली काही महिने एक कुटुंब वास्तव्यास आहे. यापूर्वीही शहरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना घडलेल्या आहेत. मात्र, अशा परिस्थितीकडे महावितरण गांभिर्याने पाहात नसल्याचे चित्र आहे. येथे रात्री अपरात्री दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत आहे. शॉर्टसर्किट होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. यामुळे येथील दुरुस्ती करून रोहित्र योग्य ठिकाणी सुरक्षित बसविण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
‘‘केंद्राकडून येणाऱ्या शासकीय योजनेच्या अंतर्गत या विद्युत रोहित्राच्या कामकाजासाठी पाठपुरावा सुरू आहे. येथील रोहित्र नियोजित ठिकाणी बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘रिजन टू रिजन या योजने अंतर्गत रोहित्र तसेच रोहित्र खांब नवीन जागेत नियोजित ठिकाणी बसविण्यात येणार आहे.
- सतीश केदार, सहायक अभियंता महावितरण
‘‘महावितरणच्या दुर्लक्षामुळे शहरात यापूर्वी दुर्घटना घडलेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन महावितरणकडून येथील धोकादायक रोहित्र सुरक्षित करणे गरजेचे आहे. येथील रोहित्र तसेच विजेचे खांब योग्य ठिकाणी त्वरित नव्याने उभारण्यात यावे.’’
- रवींद्र बाईत, नागरिक