
जुनी सांगवी-बोपोडी पुलाचे काम सुरू
जुनी सांगवी, ता. १ ः महापालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या मुळा नदीवरील जुनी सांगवी बोपोडी पुलाच्या कामाचे महापालिकेच्या वतीने महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थानिक नगरसेवक हर्षल ढोरे, स्थायी समिती सदस्य संतोष कांबळे, शारदा सोनवणे, जवाहर ढोरे, महापालिकेचे प्रकल्प नियंत्रण अधिकारी-रवींद्र सूर्यवंशी, उप अभियंता, प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, सुनील पवार कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते.
सांगवीतील नागरिकांना ब्रेमेन चौक, औंध व पुणे विद्यापीठ चौकाकडे जाण्यासाठी सध्याच्या स्पायसर पुलाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रास्तावित पुलाचे बांधकाम झाल्यास नागरिकांना बोपोडी औंधकडे विना वाहतूक कोंडी प्रवास करणे शक्य होणार आहे. सांगवीतील नागरिकांना बोपोडी, दापोडी, खडकीकडे तसेच पुणे शहराकडे जाण्यासाठी बोपोडी मार्गे जावे लागते. प्रस्तावित पुलाचे बांधकाम झाल्यास खडकी मार्गे पुणे शहराकडे जाण्यासाठीचे अंतर कमी होईल. या पुलामुळे सांगवी व बोपोडी परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नदी ओलांडण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार आहे. सध्या अस्तित्वातील स्पायसर कॉलेज पूल व रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक सुकर होण्यास मदत होऊन इंधनाची बचत होणार असून, वायू प्रदूषणात घट होण्यास मदत होईल. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहराची हद्द पुन्हा एकदा या पुलामुळे जोडली जाणार आहे.
कामाचे स्वरूप व व्याप्ती-
- पुलाची एकूण लांबी ः ७६० मीटर
- पुलाची एकूण रुंदी ः १८.६० मी.
- पुलाच्या गाळ्यांची लांबी ः १२५ मीटर (२५ मी x ५ गाळे)
- पुणे महापालिका बाजूकडील रस्त्याची लांबी ः ५५५ मीटर
- पिंपरी-चिंचवड महापालिका बाजूकडील रस्त्याची लांबी ः ८० मीटर
- वाहन मार्ग ः ७ मीटर दोन्ही बाजूस (एकूण १४ मीटर)
- दुभाजक ः ०.६० मीटर
- पदपथ ः १.५० दोन्ही बाजूस
- संरक्षक भिंत ०.५० मी. दोन्ही बाजूस आरसीसी टाइप
- संरक्षक भिंतीवर १ मीटर उंचीची अतिरिक्त आरसीसी भिंत
- १.६ मीटर उंचीचे जीआय चेनलिंक फेन्सिंग दोन्ही बाजूस
- ६०० मी. मी. व्यासाची पावसाळी लाइन चेंबर सहित दोन्ही बाजूस
कामाचा खर्च
या कामाची निविदा रक्कम रुपये ४०.८० कोटी रुपये इतकी असून, स्वीकृत निविदा रक्कम रुपये ३१.५२ कोटी होणार आहे. त्यासाठी कामाचा कालावधी २४ महिने इतका असणार आहे.
‘‘शहराच्या वैभवात भर पडेल वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होऊन नागरिकांचा वेळ वाचेल. पर्यावरण अबाधित राखण्यासाठी मदत होईल. हे काम गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- उषा ढोरे, महापौर
‘‘या कामामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड वाहतूक अधिक सोईस्कर होईल. इतर रस्त्यावरील ताण कमी होऊन नागरिकांचा वेळ वाचेल.
- प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता महापालिका
ं
जागा मालकांची उपस्थिती
स्थानिक जागा मालक राजन शितोळे, नितीन शितोळे यांच्याकडून संबंधित पुलाच्या कामासाठी ३७ गुंठे जागा महापालिकेकडून उपलब्ध करण्यात आली असून, कुटुंबातील प्रतिनिधी म्हणून माजी नगरसेवक अतुल शितोळे या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..