नवले पुलाच्या सुधारणांना 
कात्रजचा घाट!

नवले पुलाच्या सुधारणांना कात्रजचा घाट!

पुणे, ता. ११ ः मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाचा परिसर मृत्यूचा सापळा बनलेला असताना तेथे तातडीची व दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी अहवाल तयार केला जाणार होता. त्यासाठी आठ दिवसाची मुदत दिली होती, मात्र एकामागे एक अपघातांची मालिका सुरू असली तरी गेल्या दोन महिन्यांत हा सुधारणांचा अहवाल तयार करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), वाहतूक पोलिस आणि महापालिकेने ‘कात्रजचा घाट’ दाखवला आहे.
धायरी, नऱ्हे, आंबेगाव, वडगाव यासह इतर महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल चौक सोईचा आहे. नऱ्हे पासून ते सिंहगड रस्त्यावरील पासलकर उड्डाणपुलापर्यंत सर्व्हिस रस्त्याचा वापर करावा लागतो. या भागातील अवैध वाहतूक, चुकीच्या पद्धतीने लावल्या जाणाऱ्या अवजड वाहनांसह इतर चारचाकींमुळे या भागात कायम वर्दळ व वाहतूक कोंडी होते. राष्ट्रीय महामार्गावरून बेदरकारपणे चालवली जाणाऱ्या वाहनांमुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.
पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत सुमारे दोन तास यावर चर्चा झाल्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका, एनएचएआय, वाहतूक पोलिस यांची संयुक्त बैठक महापालिकेत घेतली होती. त्यामध्ये या ठिकाणच्या समस्यांवर चर्चा होऊन प्रत्येक विभागाची जबाबदारी काय यावरही चर्चा केली. त्यानुसार या चौकात सुधारणा करण्यासाठी तातडीची व दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी आठ दिवसांत अहवाल तयार करावा आणि तो केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठवला जाणार होता.

स्मरणपत्र पाठवूनही अहवाल नाही
दोन महिन्यांच्या काळात आणखी अपघात होऊन त्यात सुमारे सहा जणांचा जीव गेला आहे. त्यामध्ये १० जानेवारी आणि ११ जानेवारी रोजी सलग दोन दिवस झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे. एनएचएआयकडून सुधारणांचा अहवाल तयार करून महापालिकेला पाठवावा यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्मरणपत्र पाठवले. पण त्यानंतरही अहवाल तयार करण्याच्या कामास गती आलेली नाही.

बैठकीत उपस्थित झालेले मुद्दे
- कात्रज बोगदा ते वडगाव दरम्यानचे सहा ब्लॅकस्पॉट कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
- वेगावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी
- नऱ्हे येथील स्मशानभूमीची जागा इतरत्र स्थलांतरित करावी
- सर्व्हिस रस्ते सलग करावेत, महामार्गावरील वाहतूक कमी करावी
- महामार्गावरील वाहतूक थेट बाहेर जाण्यासाठी दुमजली उड्डाणपूल करावा
- स्थानिकांसाठी भूमिगत मार्ग करावा
- महापालिकेने या भागातील अतिक्रमण दूर करून रस्ता मोकळा करावा

२०२०-२१ मधील अपघात
एकूण अपघात - ४६
मोठे अपघात - २४
मृतांची संख्या - २३
जखमी - ६२
अपघातग्रस्त वाहने -८०

नवले पुलाच्या परिसरात सुधारणा करण्यासाठी संबंधित सर्व घटकांची बैठक घेऊन आठ दिवसात अहवाल तयार करण्यास सांगितले होते. मात्र, अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. यापूर्वी एकदा एनएचएआयला स्मरणपत्र पाठवले आहे. आता आणखी एक पत्र पाठवले जाणार आहे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com