गुन्हे वृत्त 
 
टेम्पोच्या धडकेत 
दुचाकीस्वाराचा मृत्यू

गुन्हे वृत्त टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी टेंपोचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
बलवंत लहू सुरवसे (वय २८, रा. काळेवाडी ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ज्योती दत्तात्रेय श्रीमंगले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक सुखाभाई जिवाभाई गमरा (वय ३६, रा. अहमदाबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी यांचे भाऊ सुरवसे हे शनिवारी (ता. ८) दुपारी दोनच्या सुमारास रहाटणी येथील थोपटे लॉन्स जवळील गोडांबे चौकाच्या पुढील रस्त्याने जात असताना आरोपीच्या टेम्पोने सुरवसे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सुरवसे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
---------------------
सुसगावात तरुणाला बेदम मारहाण

शिव्या दिल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सुस गाव येथे घडली. स्वराज योगेश मुरकुटे (वय १९), आदित्य खनसे (वय २०, दोघेही रा. पारखे वस्ती, सुस) व त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पार्वती लक्ष्मण साहू (रा. सुसगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा सौम्यजित हा शनिवारी (ता. ८) दुपारी अडीचच्या सुमारास पारखे वस्ती येथे क्लासला गेला होता. त्यावेळी ''तू मला त्या दिवशी शिव्या का दिल्या होत्या'' असे म्हणत आरोपी मुरकुटे याने सौम्यजितला हाताने मारहाण केली. त्यावेळी सौम्यजित खाली पडला असता, सर्व आरोपींनी सौम्यजित यास सिमेंटच्या विटेने डोक्यात मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------

चिखलीत चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा
टेम्पोची काच फोडून मारहाण करीत टेम्पोतील साहित्य चोरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिखलीतील कुदळवाडी येथे घडला. या प्रकरणी उमेश देविदास शिंदे (रा. स्वराज कॉलनी, पवारनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश जाधव व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी सातच्या सुमारास चिखलीतील कुदळवाडी येथील महादेव मंदिराजवळ मोकळ्या जागेत पत्र्याचे कंपाउंड करीत होते. त्यावेळी आरोपींनी कामाचे मटेरियल आणलेल्या टेम्पोची काच फोडली. याबाबत फिर्यादी हे जाब विचारण्यासाठी गेले असता, आरोपीने फिर्यादीस ''तू काम करीत असलेल्या जागेचा मी मालक
असून, तू कोण मला विचारणार,'' असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी हे औषधोपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेले असता आरोपी सुरेश व त्याच्या दोन साथीदारांनी टेम्पोच्या टायरची हवा सोडून टेम्पोतील ५३ हजार रुपये किमतीचे ड्रिल मशीन, ग्रॅन्डर मशिन व वेल्डिंग मशिन चोरून नेले. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-----------------

पैशांसाठी विवाहितेला मारहाण

माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेला मारहाण करीत तिचा छळ केला. याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती संजीव सुरेंद्र सिंग (वय ३६), सासरा सुरेंद्र प्रताप सिंग (वय ६५),
दीर राजीव (वय ३८), सासू (वय ६५), नणंद (वय ४८, सर्व रा.
मालाड पश्‍चिम) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माहेराहून पैसे आणण्यासह घरातील इतर किरकोळ कौटुंबिक वादातून आरोपींनी विवाहितेला सतत मारहाण, शिवीगाळ करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-------------------------

भोसरीत मोबाईल हिसकावून चोरटे पसार

पायी जाणाऱ्या तिघांकडील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पसार झाले. हा प्रकार भोसरी एमआयडीसी येथे घडला.

याप्रकरणी ऋषिकेश प्रकाश फडतारे (रा. भगतवस्ती, भोसरी, मूळ नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. भोसरी एमआयडीसीतील सेक्टर क्रमांक दोन येथे दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी फिर्यादी यांचा सहा हजार रुपयांचा, मेहफुज सतार शेख यांचा दहा हजारांचा व वर्षा बाळासाहेब थोरात यांचा तीन हजाराचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर चोरटे पसार झाले. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-------------------

छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा
फ्लॅटचा हप्ता भरण्यासाठी विवाहितेला तिच्या वडिलांकडे पैसे मागण्यास सांगितले. त्यास विवाहितेने नकार दिल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती नितीन माधवराव देशमुख (वय ४२, रा. फेज दोनब, दलापूर पूर्व ), सासरा माधवराव अण्णासाहेब देशमुख (वय ६६), सासू (वय ६२), नणंद (वय ४४, सर्व रा. रा. पेंडसे नगर, डोंबिवली पूर्व) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पतीने फ्लॅटचा हप्ता भरण्यासाठी विवाहितेला तिच्या वडिलांकडे पैसे मागण्यास सांगितले. त्यास विवाहितेने नकार दिल्याने तिला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. तसेच इतर आरोपींऩीही विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
---------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com