सेमीकंडक्टरचा तुटवडा सहा महिन्यात दूर होण्याची चिन्हे 
ऑटोमोबाइल उद्योग थंड

सेमीकंडक्टरचा तुटवडा सहा महिन्यात दूर होण्याची चिन्हे ऑटोमोबाइल उद्योग थंड

Published on

सेमीकंडक्टरचा तुटवडा दूर होण्याची चिन्हे
किमती वाढल्याने शेकडो कंपन्यांच्या उत्पादनात घट, सहा महिन्यांत परिस्थिती पूर्वपदावर येणार

पिंपरी, ता. ३० : इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीत सेमीकंडक्टरचा (विविध धातूंपासून बनविलेली चिप) उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोना महामारीत जगभरात पहिल्या लाटेत चिपच्या उत्पादनात घट झाल्याने तुटवडा निर्माण झाला होता. दोन वर्ष उलटल्यानंतर तिसऱ्या लाटेत काही अंशी उद्योगांमध्ये तुटवडा भासत आहे. अद्यापही चाकण, भोसरी, तळेगाव, शिक्रापूर एमआयडीसीत सेमी कंडक्टवरच्या किमती वाढल्याने शेकडो कंपन्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. परंतु, पाच ते सहा महिन्यांत सेमी कंडक्टरचा तुटवडा पूर्णपणे दूर होणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

तैवान, चायना, जर्मनी आणि दक्षिण कोरियामधून सुमारे ८० टक्के उत्पादन सेमीकंडक्टरचे होत आहे. लॉकडाउनमध्ये मागणी घटल्यानंतर पुरवठा अपुरा पडल्याने ऑटोमोबाइलमधील ७५ टक्के उद्योग थंड पडले. वाहन उद्योगांसह, इतर उद्योगांच्या उत्पादन क्षमतेत मोठी घट झाली. नवीन चारचाकी वाहने देखील सहा महिने ते एक वर्षे वेटिंगवर आहेत. याचा विपरीत परिणाम सामान्य कामगार व उद्योजकांसह उद्योगधंद्यावर झाला. केंद्र सरकारला मिळणाऱ्या जीएसटी उत्पन्नातदेखील घट झाली. हे नुकसान कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. त्यानंतर सेमीकंडक्टर निर्मितीसाठी प्रॉडक्शन लिंक इन्सेंटिव्हला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे, आगामी सहा वर्षांमध्ये या योजनेवर ७६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, २.३ लाख कोटी रुपये प्रोत्साहनपर देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्वदेशी सेमीकंडक्टरची निर्मिती करणारे आणि त्यांचा वापर करणाऱ्या कंपन्यांना ताकद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी, पिंपरी-चिंचवडमधील बडे उद्योजक देखील त्या दृष्टीने पावले टाकत असल्याचे दिसून आले आहे.

सेमीकंडक्टरला पर्याय कोणताच नसल्याने ते उत्पादन लवकरात लवकर भारतात सुरु करणे हा एकमेव पर्याय आहे. कारण, ज्यावेळी कस्टमरला (OEM - Original Equipment manufacturer) म्हणजेच ॲाटोमोटिव्ह उत्पादकाला मार्केटमधून पुरवठा होइल, त्याचवेळी व्हेंडर लोकांना काम मिळणार आहे. त्यामुळे ॲाटोमोटिव्ह तसेच इलेक्ट्रॉनिक फिल्डमध्ये व्हेंडर म्हणून काम करणाऱ्या कंपन्यांना तुटवड्यामुळे अडचण आली आहे. तरीही, सध्या काही अंशी चिपची परिस्थिती पूर्वीपेक्षा बरी असल्याचे काही उद्योजकांनी सांगितले.
---
सेमीकंडक्टरचा उपयोग
प्रत्येक व्यक्ती एकापेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करत आहे. त्यामध्ये संगणक, लॅपटॉप, स्मार्ट कार, वॉशिंग मशिन, एटीएम आणि स्मार्टफोनचा समावेश आहे. मात्र, ही उत्पादने सेमीकंडक्टरविना अपूर्ण आहेत. सेमीकंडक्टरद्वारे या उपकरणांचे नियंत्रण केले जाते. त्याची निर्मिती सिलिकॉनद्वारे केली जाते. सेमीकंडक्टर चांगले विद्युत वाहक आहेत. त्यांना मायक्रो सर्किटमध्ये बसवले जाते. मायक्रोचिप्स, ट्रांजिस्टर आणि इलेक्ट्रॉनिक सेन्सरची निर्मिती सेमीकंडक्टरद्वारेच केली जाते. हाय ॲंड कम्प्युटिंग, ऑपरेशन कंट्रोल, डेटा प्रोसेसिंग, स्टोरेज, वायरलेस कनेक्टिविटी आदींसाठी यांचा वापर केला जातो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्वांटम कम्प्युटिंग, ॲडव्हान्स वायरलेस नेटवर्क, ब्लॉकचेन ॲप्लीकेशन, ५जी, ड्रोन, रोबोटिक्स, गेमिंग आणि वेअरबेल्सचा सेमीकंडक्टर हा अविभाज्य भाग आहे.
-----
सेमीकंडक्टर उत्पादनासाठी केंद्र सरकारकडून नवीन योजना आखण्यात आली असून, त्याद्वारे भारताला उत्पादनाची हब बनविण्यात येणार आहे. सध्या भारत २४ अब्ज डॉलरच्या सेमीकंडक्टरची आयात करत आहे. ही आयात २०२५ पर्यंत जवळपास १०० अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टरचे असेच एक धोरण काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने आणले होते. मात्र, ते पूर्णपणे फोल गेले. तरी या वेळेला हे धोरण कसे यशस्वी करता येईल, यासाठी केंद्राने संपूर्ण यंत्रणा कामाला लावावी, हीच सर्व उद्योजकांकडून अपेक्षा आहे.
- जयदेव अक्कलकोटे, अध्यक्ष, चाकण एमआयडीसी उद्योजक संघटना
---


तैवान, चायना या देशातून सेमीकंडक्टर येत आहेत. पुढील किमान पाच ते सहा महिन्यांत हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. सेमी कंडक्टरच्या किमती वाढल्याने त्याचा मोठा परिणाम उत्पन्नावर झाला होता. सध्या काही प्रमाणात परिस्थिती निवळली आहे.
- प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com