पोलिस असल्याचे भासवून दागिने चोरणारी इराणी टोळी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस असल्याचे भासवून दागिने चोरणारी इराणी टोळी गजाआड
पोलिस असल्याचे भासवून दागिने चोरणारी इराणी टोळी गजाआड

पोलिस असल्याचे भासवून दागिने चोरणारी इराणी टोळी गजाआड

sakal_logo
By

इराणी टोळी गजाआड

पोलिस असल्याचे भासवून दागिन्यांची चोरी

पिंपरी, ता. १३ : ‘आम्ही पोलिस आहोत, पुढे खून झाला आहे, दागिने सुरक्षित ठेवा'', अशी बतावणी करून नागरिकांचे सोन्याचे दागिने हातचलखीने पळवणाऱ्या इराणी टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ६ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हैदर तहजीब सय्यद (वय ५५), युनूस साबुर सय्यद (वय ४६), गाझी रफिक जाफरी (वय ३५, सर्व रा. आंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हैदर उर्फ लंगडा पप्पू सय्यद उर्फ इराणी (वय ३५) हा फरारी आहे. ४ जानेवारीला रहाटणीतील कोकणे चौक येथे लक्ष्मण देशमुख यांच्याकडे अनोळखी तिघेजण आले. त्यांनी पोलिस असल्याचे भासवून ''सोने चोरीचे गुन्हे घडत आहेत, आपण परिधान केलेले सोने पिशवीत सुरक्षित काढून ठेवा'' असे सांगत दोन लाख वीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून लंपास केले. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासून आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून ते इराणी असल्याचे निष्पन्न झाले. हे आरोपी आंबिवली कल्याण, ठाणे येथील असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपींची नावे निश्चित झाल्यानंतर त्यापैकी एकजण सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. मोबाईल लोकेशनवरून आरोपी बनेली, ता. कल्याण, जि, ठाणे येथील एका हॉटेलच्या मागे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी येथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले तर एकजण दलदलीच्या गवताळ भागातून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून चिखलात लपून बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतले.
या आरोपींकडून वाकड ठाण्यातील चार तसेच हिंजवडी, निगडी व मानपाडा पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. या त्यांच्याकडून १२५ ग्राम सोन्याच्या दागिन्यांसह दुचाकी व मोबाईल असा एकूण सहा लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, जावेद पठाण, बापूसाहेब धुमाळ यांच्या पथकाने केली.

अशी करायचे चोरी
पोलिस असल्याची बतावणी करून समोर खून झाला आहे, चोरी झाली आहे, तुम्ही असे दागिने घालून काय फिरता, दागिने काढून पिशवीत ठेवा, असे सांगायचे. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून दागिने आपल्याकडे सुरक्षित असल्याचे भासवत दागिन्यांची पिशवी आपल्याकडे घ्यायची. हातचलाखीने त्यातील दागिने काढून घ्यायचे व रिकामीच पिशवी समोरील व्यक्तीला परत द्यायची. समोरील व्यक्तीने घरी गेल्यानंतर पिशवी उघडून पाहिल्यास सर्व प्रकार समोर येत असे. अशाप्रकारे या चोरट्यांनी अनेकांना गंडा घातला आहे. त्यांच्यावर अशा घटना व सोनसाखळी चोरी असे एकूण ऐंशी गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.


अटक करण्याचे होते आव्हान
आंबिवली या इराणी वस्तीत जाऊन अटक करताना यापूर्वी अनेक पोलिस पथकाला जमावाने घेरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. कोणत्याही पुरुष आरोपीस आंबिवली वस्तीतून बाहेर घेऊन जाताना इराणी वस्तीतील महिला आक्रमक होऊन पोलिस पथकाला प्रतिकार करतात. त्यामुळे येथून आरोपींना अटक करणे आव्हानात्मक असते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top