जनता सब जानती है।

जनता सब जानती है।

लग्न ठरलं की यजमानांची धांदल उडते. घरापासून मांडवापर्यंत सगळे सजायला सुरू होते...असंच काहीसं शहरात सुरू आहे. पाच वर्षे झोपलेले नगरसेवक आता आपापल्या भागात सजावट करू लागले आहेत. तसेच वावटळ आल्यासारखी विविध मागण्यांची निवेदने महापालिका अधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकत आहेत. लेकिन जनता सब जानती है।
-अविनाश म्हाकवेकर
......................................
शहरात कोणत्याही प्रभागात फेरफटका मारला तरी रंगरंगोटी, डांबरीकरण, पेव्हिंग ब्लॉकचे काम सुरू असल्याचे दिसते. महापालिका सभागृहात एकदाही तोंड न उघडलेल्या सदस्याचाही प्रभाग याला अपवाद राहिलेला नाही. अगदी कालपरवापर्यंत नागरिक ओरडत होते रस्ते करा, गतिरोधक बसवा, पदपथ बनवा...असे बरेच काही. मात्र आता गेल्या पंधरा दिवसांपासून नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदार अशा साऱ्यांनी मिळून अशी काही गती पकडली आहे की, थांबायचं नावच नाही. मागणी नव्हती तिथेही रंगसफेदी केली जात आहे. अगदी रस्त्याकडेची झाडे सोडलेली नाहीत. पाण्याविना तडफडून वाळलेली, संरक्षक जाळ्या खोडांमध्ये घुसून जीव गुदमरलेली, होर्डिंगच्या जागेसाठी फांद्या तुटून जखमी झालेली ही झाडे नवनवे रंग लेवून उभी आहेत. बीआरटीचे कठडे, भुयारी मार्गाच्या भिंती, रस्ता दुभाजकाचे दगड यांचेही भाग्य फळफळले आहे.

सैन्याची एखादी पलटन अंगावर चालून यावी तसे डांबरीकरण सुरू आहे. एखाद्या रस्त्यात भल्या सकाळी लोक घुसतात. अग्रभागी झाडू घेतलेले काहीजण, मागे डांबरयुक्त खडी ओतणारे यंत्र, त्याच्या मागे रोलर...दे दणादण. काही ठिकाणी चेंबर आहेत, पाणी सोडण्याचे व्हॉल्व्हची खोलगट जागा आहे, पण कशाची फिकीर नाही. त्यावर बदाबदा खडी ओतली जाते आणि आणखी खड्डा भरला, असे समजून रणगाडा रोलर फिरवला जातो. संबधीत भागातील नागरिकाला सोडाच नगरसेवकालाही समजत नाही ही फौज आता कुठून कुठे शिरणार आहे. घरातून बाहेर पडल्यावरच लोकांना समजते की, पुढील रस्त्यावर आडवी फीत बांधली आहे. आणि मग नवागत लोक पर्यायी मार्गाचा शोध घेत घेत इच्छित रस्त्याला लागतात.

डांबरीकरण झाले की लगेच गतिरोधक उभारणी. प्रमाणित उंचीचे लोखंडी अँगलचे सांगाडे अंथरायचे. त्यात राडारोडा टाकायचा, सिमेंटनामक पाणी पसरायचे आणि वर पेव्हिंग ब्लॉक. झाला गतिरोधक. अरे, पण दोन गतिरोधकात किती अंतर असावे? कोणत्या ठिकाणी असावेत?...या काही धरबंदच नाही. काही काही जागी तर दोन दोन गतिरोधक दिसतात. का? तर म्हणे तिथे नगरसेवकाचे घर, जनसंपर्क कार्यालय आहे! गतिरोधकाजवळ वाहनाची गती कमी कमी होत जाते आणि लोकांचे तिकडे लक्ष जाते. किती हे वैचारिक दारिद्र्य! पेव्हिंग ब्ल़ॉकमध्ये थ्री डी हा नवा प्रकार आला आहे. नगरसेवकाच्या घराचा परिसर सजविण्यासाठी तो लावला जात आहे की काय अशी शंका येते.

पदपथ इतके मोठे आहेत की त्याच्या लगतचे दुकानदार, पानाच्या टपऱ्या, किरकोळ विक्रेते, भाजी व्यावसायिक यांना ऐसपैस जागा उपलब्ध झाली आहे. टपरी अडीच फूट बाय तीन फूट आकाराची. आणि तो वापरतो पदपथावरची जागा शंभर चौरस फूट, अगदी हक्काची असल्यासारखी. पादचारी पुन्हा रस्त्यावरून चालतोय. असले सुंदर पदपथ काय कामाचे. टपरीचालक म्हणतात हफ्ता देतोय. हा मलिदा कोणाकडे..हा प्रश्न पुन्हा अनुत्तरीत आहे.

रंगरंगोटी म्हणजेच शहर सौंदर्य. बेगडीपणा चालला आहे सर्व. निवडणुकीची लवकर घोषणा होणार आहे, मग नको का सजायला? पाच वर्षे गेली अशीच. आता कामं दाखवताहेत! गेली पाच वर्षे काय केले मग? मतदारांनी तोंडावर आपटायला नको म्हणून जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे सर्व. काहींना हेही जमले नाही. ते आता साथीचा आजार यावा तसे आयुक्तांना निवेदने देत सुटलेत. दररोज निवेदन. आयुक्त भेटले तर एक फोटो काढायचा. लगेच सोशल मिडियावर व्हायरल करायचा. आयुक्त भेटलेच नाही तर बाहेर बसलेल्या शिपायाच्या टेबलवरचा शिक्का स्वतःच उचलून निवेदनावर मारायचा आणि सगळीकडे हाळी देत सुटायचे मी निवेदन दिले, मी मागणी केली. असे करणाऱ्यांनो, मतदारांना गृहित धरू नको रे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com