
कोरोनामुक्तीकडे शहराची वाटचाल रुग्णालयात दाखल रुग्ण पन्नासपेक्षा कमी; सक्रिय रुग्ण पाचशेच्या आत
पिंपरी, ता. २८ ः कोरोना संसर्ग झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आणि रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या पन्नासच्या आत आहे. शिवाय, मृत्यूचे प्रमाणही घटले असून, शहराची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाली असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, आरोग्याबाबतचे अनेक चढउतार शहराने अनुभवले आहेत. अनेकांनी आपले आप्तस्वकीय, कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. आतापर्यंत तीन लाटा अनुभवल्या आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेची भयानकता सध्याच्या तिसऱ्या लाटेच्या तुलनेने खूपच गंभीर होती. तिसऱ्या लाटेतही अर्थात गेल्या एक जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढतच होती. डिसेंबर २०२१ च्या अखेर दोन लाख ७९ हजार १३६ जणांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यातील दोन लाख ७४ हजार ८७९ जणांनी कोरोनावर मात केली होती. चार हजार ५२६ जणांचा बळी गेला होता. दिवसाला सरासरी ११० च्या आसपास नागरिकांना संसर्ग झाल्याचे आढळत होते. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र, नवीन वर्षाच्या स्वागताचा माहोल ओसरतो न ओसरतो तोच साधारण जानेवारीच्या दुसऱ्या सप्ताहापासून ओमिक्रॉनच्या संसर्गाने डोके वर काढले. कोरोना संसर्गही वाढू लागला. दिवसाला संसर्ग झालेली संख्या झपाट्याने वाढू लागली होती. दररोज अडीच हजारांवर पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. पॉझिटिव्हिटी दर अर्धापाऊण टक्क्यावरून थेट २५ टक्क्यांपर्यंत पोचला होता. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. ही स्थिती साधारण एक महिनाभर अर्थात फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहापर्यंत राहिली. त्यानंतर संसर्ग कमी होऊ लागला. लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळे रुग्णालयांत दाखल रुग्णांची संख्या कमी झाली. आता फेब्रुवारीच्या अखेरीस तर कोरोनामुक्तीकडे शहराची वाटचाल सुरू झाली आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरू असतानाही संसर्गाचे प्रमाण दिवसाला पन्नास रुग्णांच्या आसपास आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही पाचशेच्या आत आली आहे.
कोरोना संसर्ग कमी झालेला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाणही अत्यल्प आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहे. मार्केट, शाळा, कॉलेज, उद्याने सर्व खुले झाले आहे. तरीही कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे आवश्यक आहे. सरकार व आरोग्य मंत्रालयाच्या पुढील सूचना येईपर्यंत प्रत्येकाने मास्क वापरणे अत्यावश्यक आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
दृष्टिक्षेपात रुग्ण
तारीख / पॉझिटिव्ह / सक्रिय रुग्ण ः रुग्णालयात / गृहविलगीकरणात
१ जानेवारी / ११२ / २२८ / २३६
१५ जानेवारी / २५४५ / ४९६ / १३४९०
१ फेब्रुवारी / १६९६ / ३११ / १२९०२
१५ फेब्रुवारी / १४६ / ११९ / १७४४
२८ फेब्रुवारी / .... / ..... /.....
------------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..