
शहरात महादेवाचा गजर
पिंपरी, ता. १ : दही-दूध, बेल-फूल असलेले पूजेचे ताट घेऊन दर्शनासाठी येणारे भाविक, कानी पडणारी महादेवाची गाणी व हर हर महादेवचा गजर अशा प्रसन्न वातावरणात मंगळवारी (ता. १) महाशिवरात्री शहरात उत्साहात साजरी झाली. पहाटेपासूनच शहरातील महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना, व्रत करून मनोभावे दर्शन घेतले जाते. जवळच्या शिवमंदिरात जाऊन अभिषेक, पूजा करतात. पिंपरी-चिंचवड शहरातही अनेक ठिकाणी शिवमंदिरे आहेत. यामध्ये काही प्राचीन शिवालयाचाही समावेश आहे. या मंदिरातही मंगळवारी महापूजा, अभिषेक, भजन, कीर्तन, महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अनेकजण सहकुटुंब दर्शनाला येत होते. दुपारी बारापर्यंत गर्दी होती. त्यानंतर गर्दी काहीशी ओसरली. मात्र, दुपारनंतर पुन्हा रांगा लागल्या. शहरातील मंदिरांना फुलांची सजावट करण्यासह रोषणाई केली होती.
पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये काकड आरती, पारायण, भजन, हरिपाठ, कीर्तन झाले. तर चिंचवडगावातील श्री धनेश्वर मंदिर प्राचीन शिवालय येथे पहाटे अभिषेक व महापूजा त्यानंतर महाशिवरात्री पहाट कार्यक्रम झाला. त्यानंतर दिवसभर चिंचवड परिसरातील विविध भजनी मंडळांनी भजन सादर केले. सायंकाळी महाआरतीनंतर मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर तर रात्री एकतारी भजन झाले.
देहूतील सिद्धेश्वर मंदिर येथेही विविध कार्यक्रम झाले. दर्शनासाठी दूर अंतरापर्यंत रांग लागली होती. मंदिर परिसरात सुंदर सजावट केली होती.
त्याचप्रमाणे रावेत गावठाण, आकुर्डी, निगडी प्राधिकरण, चिखलीगाव, म्हेत्रे वस्ती, मोशीतील गायकवाड वस्ती, देहू-आळंदी रस्ता, भोसरी गावातील लांडगे आळी, निगडी, दापोडी, पिंपरी, काळेवाडी, तळवडे तसेच कासारवाडीतील शंकरवाडी आदी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भक्तिगीते, भजन व हर हर महादेवचा गजर यामुळे परिसरातील वातावरणही प्रसन्न झाले होते.
यात्रेचे स्वरूप...
मंदिर परिसरात हार फुलांची व मिठाई दुकाने थाटली होती. तसेच, लहान मुलांसाठी खेळणीही होती. त्यामुळे काही ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते. देहूरोडजवळील घोरावडेश्वर डोंगरावरील प्राचीन मंदिरातही देहूरोड परिसरासह पिंपरी-चिंचवड व तळेगाव, वडगाव, लोणावळा आदी ठिकाणचे भाविक दर्शनासाठी गर्दी केली होती.
उपवास अन् फराळ
महाशिवरात्रीच्या दिवशी अनेकजण उपवास करतात. त्यामुळे मंगळवारी घरोघरी साबुदाण्याची खिचडी, राजगिरावडी, रताळे आदी फराळाचे पदार्थ होते. तसेच, मंदिरातील प्रसाद वाटपातही याच पदार्थांचा समावेश होता.