
पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी झिंझुर्डे
पिंपरी, ता. १ : पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे शशिकांत ऊर्फ बबन झिंझुर्डे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजता घोषित केले. या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या बाहेर घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला.
पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी शुक्रवारी (ता. २५) निवडणूक झाली होती. मतमोजणी झाल्यानंतर आपला महासंघ पॅनेलचे प्रमुख व अध्यक्षपदाचे उमेदवार अंबर चिंचवडे यांनी अध्यक्षपदाच्या मतांवर आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी निकाल घोषित केला. झिंझुर्डे यांना दोन हजार ५३४ व चिंचवडे यांना दोन हजार ५२५ मते मिळाली आहेत. सर्व २५ जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांना गुरुवारी (ता. ३) निवडणूक कार्यालयात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, असे जाधव यांनी सांगितले.