
शहरातील वैभवात मेट्रोमुळे भर
पिंपरी, ता. ७ ः पिंपरी-चिंचवड महापालिका भवन अर्थात पीसीएमसी ते फुगेवाडी मार्गावर प्रवाशांना घेऊन पहिल्यांदा मेट्रो धावली. पहिल्याच दिवशी तेही अवघ्या काही तासांत म्हणजेच दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत सहा हजार ९९५ नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. दोन लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळाले. ही मेट्रोच्या यशाची पहिली पायरी ठरणार आहे. भविष्यात मेट्रोमुळे व तिच्या विस्तारित मार्गामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी या मार्गिकेतील दापोडी ते पिंपरी या सुमारे ११ किलोमीटर अंतराचा समावेश होतो. त्या दरम्यान दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी (नाशिक फाटा), संत तुकारामनगर (वल्लभनगर) व पिंपरी (पिंपरी-चिंचवड महापालिका भवन) या स्थानकांचा समावेश होतो. त्यातील फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावरील मेट्रो सेवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाइन लोकार्पण झाले आणि नागरिकांचा प्रतिसाद असल्याचे दिसून आले.
उद्घाटनानंतर दुपारी तीन वाजल्यापासून प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पीसीएमसीसह भोसरी व कासारवाडी स्थानकांची अपूर्ण कामे पूर्ण केली जात आहेत. पीसीएमसी स्थानकाचे काम झाले असून दोन जिन्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. एका जिन्याचा वापर करून प्रवास सुरू केला आहे. संत तुकारामनगर व फुगेवाडी स्थानकाचे काम झाले आहे. सद्य स्थितीत दोन गाड्या धावत आहेत. त्यांचा प्रतितास वेग ३० ते ३५ किलोमीटर आहे. आगामी काळात हा वेग तासाला ८० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
पीसीएमसी कनेक्टिव्हिटी
भविष्यात प्रत्येक स्थानकाला पीएमपी बसची कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. सध्या स्थितीत पीसीएमसी, संत तुकारामनगर व भोसरी स्थानकांना कनेक्टिव्हिटी आहे. पीसीएमसी व भोसरी स्थानकांना लोकल रेल्वेची आणि संत तुकाराम स्थानकाला एसटीचीही कनेक्टिव्हिटी आहे.
-------------
जोडली गेलेली गावे
- पीसीएमसी स्थानक ः चिंचवड स्टेशन, चिंचवडगाव, मोहननगर, मोरवाडी, चिखली, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, खराळवाडी, नेहरूनगर, पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प काळेवाडी
- संत तुकारामनगर स्थानक ः वल्लभनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, नेहरूनगर, यशवंतनगर
- भोसरी-नाशिक फाटा ः भोसरी, मोशी, दिघी, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड
- कासारवाडी ः कासारवाडी, कुंदननगर, पिंपळे गुरव
- फुगेवाडी ः कुंदननगर, फुगेवाडी, दापोडी, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव
---
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..