
गरजेपेक्षा जास्त असल्यास दुसऱ्यांना देऊन टाका
हजरत पैगंबर म्हणतात, ‘‘एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा जास्त जमीन असेल तर त्याने काही मूल्य न घेता गरीब शेतकऱ्यास कसावयास द्यावी.’’
त्याकाळी शेतकऱ्याची अत्यंत विपन्नावस्था होती. कसलेल्या जमिनीतील पिकाचा मोठा भाग मालकाला दिल्याखेरीज त्या बिचाऱ्याला त्याने पिकविलेल्या धान्याची भाकरी करून खाता येत नसे. मालकाखेरीज पुरोहितालाही काही द्यावे लागे. शिल्लक राहिलेल्या तोकड्या धान्यसामग्रीवर त्या शेतकऱ्याला व त्याच्या कुटुंबीयांना वर्षभर गुजराण करावी लागे. ही अवस्था नष्ट करण्याच्या हेतूनेच शेतकऱ्याकडून काही मूल्य न घेता त्याला जमीन कसावयास द्या, असा जमीनदारांना हजरत पैगंबरांनी आदेश दिला आहे.
‘आपल्या गरजेपेक्षा जास्त असेल ते दुसऱ्यास देऊन टाका.’ अशी पवित्र कुराणमध्येही आज्ञा देण्यात आली आहे.
आपल्या गरजेपेक्षा जास्त कोणतीही वस्तू वापरता कामा नये, हे समाजवादी ध्येयाचे एक सूत्र आहे आणि त्या सूत्राचा हजरत पैगंबरांनी जोराने पुरस्कार केला आहे.
असहाय्य नागरिकांना अन्न व कपडा पुरविण्याची व्यवस्था होतीच, पण, त्याला कर्ज असेल ते कर्जही सरकारी खजिन्यामधून अदा करण्याची जबाबदारी शासनसंस्थेने घेतली होती. (बुखारी ४३:११) हे हजरत पैगंबरांच्या लोकशाहीमधील एक ठळक वैशिष्ट्य होय.
हजरत पैगंबराच्या लोकशाहीत प्रत्येक नागरिकास पूर्ण स्वातंत्र्य होते. कोणीही सर्वसाधारण नागरिक राज्यप्रमुखास बेडरपणे जाब विचारीत असे. एकदा एका नागरिकाने खलिफा उमर यांना भर सभेमध्ये एका गोष्टीचा जाब विचारला. त्याबरोबर काही लोकांनी त्या नागरिकास गप्प बसविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून खलिफा म्हणाले, ‘‘त्याला मोकळेपणाने बोलू द्या. नागरिकांनी जाब विचारून आम्हांस जाणीव करून दिली तर त्यांनी आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले असेच मी म्हणेन.’’
डॉ. एस. एन. पठाण
(लेखक माजी कुलगुरू आहेत.)
* इफ्तार ६.५७ (सोमवारी सायंकाळी)
* सहेरी ४.४८ (मंगळवारी पहाटे)
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..