लेखकांनी विवेकाचा आवाज ऐकलाच पाहिजे

लेखकांनी विवेकाचा आवाज ऐकलाच पाहिजे

पिंपरी, ता. ९ ः ‘‘विवेकाचा आवाज हा समाजाचा आवाज असतो. सध्या चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजात संभ्रम निर्माण होत आहे. अशावेळी समाजाचा आरसा असणाऱ्या लेखकांनी विवेकाचा आवाज ऐकलाच पाहिजे आणि ती आजच्या काळाची नितांत गरज आहे. संमेलनाध्यक्ष या नात्याने गावोगावी जाऊन वैचारिक पेरणी करणार आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले.
उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेसह विविध संस्थातर्फे सासणे यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. मसापचे शाखाध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनिता ऐनापुरे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ, सचिव संजय जगताप, कार्यकारिणी सदस्य माधुरी मंगरुळकर, किशोर पाटील, विविध संस्थांचे प्रतिनिधी माधव राजगुरू, प्रा. अशोक पगारिया, संपत गर्जे, डी. बी. शिंदे, अविनाश कांबीकर, प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.
संमेलनात बालसाहित्यावर परिसंवाद होण्याची गरज, मराठीवर हिंदीचा प्रभाव, वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची खंत या संबंधात वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. सुरेखा कटारिया यांची ध्वनिफीत आणि मराठी साहित्य व कला मंडळाच्या साहित्य दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. संजय जगताप यांनी आभार मानले.

‘‘जो कोणी संमोहनातून जागृत करण्याचा प्रयत्न करतो, तो काही दुष्ट प्रवृत्तींना आवडत नसतो. कोंबडा पहाटे जागृत करण्याचे काम करतो, तो सर्वाधिक मारल्या जातो, हे ध्यानात ठेवले पाहिजे. लेखकाने भीती न बाळगता आपल्या लेखणीने जागृती निर्माण केली पाहिजे आणि अंधारातील सत्य उलगडले पाहिजे, जे मी माझ्या लिखाणातून करत आलो आहे. आपल्याकडे वैचारिक परंपरा आहे, तेव्हा विचार करून आपला वैचारिक धर्म पाळला पाहिजे.’’
- भारत सासणे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com