
रावेतमध्ये कामगाराने चोरले दोन लाखांचे कपडे
पिंपरी : कपड्याच्या दुकानात कामाला असलेल्या कामगाराने गोडाऊन मधील दोन लाखांचे कपडे चोरले. हा प्रकार रावेत येथे घडला. मुकेश नाथ (वय ३०, रा. पाली मारवाड जंक्शन , राजस्थान) व गुड्डू अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रवणकुमार तेजाराम चौधरी (रा. सुमानी रेसिडेन्सी , पुनावळे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे दुकान असून मुकेश तेथे कामाला आहे. दरम्यान, मुकेश व त्याचा मित्र गुड्डू यांनी मिळून फिर्यादीच्या रावेत येथील गोडावूनमधून साड्या, गाऊन, कुर्ता अशा प्रकारचे दोन लाख आठ हजार ७६० रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
देहूत महिलेला मारहाण; तिघांवर गुन्हा
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार देहूगाव येथे घडला. या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैशाली मांडवे, निर्मला गायकवाड , तात्याराम मांडवे (सर्व रा. शिवनगरी सोसायटी, देहूगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (ता. ५) फिर्यादी यांचा मुलगा रस्त्यावर खेळत असताना आरोपी वैशाली फिर्यादीच्या पतीला म्हणाली ''तुझ्या मुलाला समजावून सांग'' . त्यानंतर फिर्यादीला हंड्याने मारहाण केली. यामध्ये त्या जखमी झाल्या. तसेच फिर्यादीच्या मुलाला तात्याराम मांडवे व निर्मला गायकवाड यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत धमकी दिली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एकाला निगडी पोलिसांनी अटक केली. ही घटना निगडी येथे घडली.
जिसान अब्रार कुरेशी (वय ४०, रा. अंकुश चौक, ओटास्कीम , निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. ४ ) सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी यांची पाच वर्षीय मुलगी तिच्या मावस भावासह खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच आठ दिवसांपूर्वीही या आरोपीने अशाच प्रकारे आणखी एका सहा वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
भोसरीत विनयभंग करून धमकी
महिलेचा विनयभंग करून पोलिसात तक्रार केल्यास धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला. संजय माने (रा. चक्रपाणी वसाहत, पांडवनगर कॉलनी, भोसरी ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या रविवारी (ता. ६) घरासमोर त्यांच्या जाऊसह गप्पा मारत उभ्या होत्या. दरम्यान, आरोपीने त्यांच्याकडे पाहून अश्लील वर्तन केले. याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. जाऊ यांनी फिर्यादीला सोडविले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून पोलिसात तक्रार केल्यास परिसरात राहू देणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
भोसरीत अल्पवयीन मुलाला मारहाण
तेरा वर्षीय मुलाला मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल हिसकावला. हा प्रकार भोसरी येथे घडला. याप्रकरणी संतलाल रामजीलाल सिंग (रा. पद्मावती अपार्टमेंट, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा तेरा वर्षीय मुलगा घराच्या बाहेर पायी जात होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आरोपी त्याच्याजवळ आले. मागे बसलेले दोघेजण खाली उतरले. एकाने मुलाला मारहाण केली तर दुसऱ्याने मुलाला चाकूचा धाक
दाखवून त्याच्याकडील सात हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
देहूत विनयभंगप्रकरणी एकाला अटक
घरात शिरून महिलेशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. हा प्रकार देहूगाव येथे घडला. रोहित बंडू चौधरी (वय १८, रा. पाण्याच्या टाकीजवळ, विठ्ठलवाडी, देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. रविवारी (ता.६) आरोपी हा फिर्यादी यांच्या घरात शिरला. फिर्यादीसह त्यांच्या सासूशी अश्लील वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..