लोकसंख्या वाढली; पाणी स्रोत तितकाच

लोकसंख्या वाढली; पाणी स्रोत तितकाच

पिंपरी, ता. १४ ः गेल्या दहा वर्षात शहर झपाट्याने विकसित झाले. गृहप्रकल्प पर्यायाने निवासी भाग वाढला. लोकसंख्या वाढली. मात्र, पाणीपुरवठ्याचा स्रोत दहा वर्षांपूर्वीचाच आहे. पवना नदीवरील रावेत बंधारा. महापालिका पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी आणण्याचे नियोजन आहे. त्याअंतर्गत चिखलीत जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी मिळणार आहे. भामा-आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर कोटा मंजूर आहे. त्याचेही काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या अमृत व २४ बाय ७ योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकून नवीन नळजोड दिले आहेत. या माध्यमातून पाणी चोरीला आळा घालण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
मानांकनाप्रमाणे एका व्यक्तीसाठी दिवसाला १३५ लिटर कोटा ठरलेला आहे. मात्र, ५५ टक्के लोक त्यापेक्षा दुप्पट पाणी वापरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मोरेवस्ती, सानेवस्ती, चिखली या भागात मोठ्या प्रमाणात घरे वाढली. या भागात ७५ हजार लोकसंख्या आहे. सुमारे ५२ गल्ल्या आहेत. तीन मजली इमारती झाल्या आहेत. पण इमारती खाली पाण्याच्या टाक्या नाहीत. दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने त्यांची पाण्याची एकही तक्रार नाही. शहरातील इंडस्ट्रिअल भागाचे मोठ्या प्रमाणात रहिवाशीकरणात रूपांतर होत आहे. त्यामुळे या भागालाही महापालिकेला पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, गेल्या दहा वर्षात जादा पाणी मिळण्यासाठी प्रयत्न झाले, परंतु, अद्याप पाणी मिळालेले नाही. ‘समोर पाणी दिसतंय पण, नळाद्वारे घरांपर्यंत येत नाही,’ अशी शहराची स्थिती झाली आहे.

तेव्हा आणि आता
२००१ मध्ये लोकसंख्या १० लाख सहा हजार ४१७ आणि २०११ च्या जनगणनेनुसार १७ लाख २७ हजार ६९२ होती. तेव्हा प्रतिदिन प्रतिव्यक्ती २५० लिटर पाणी असे नियोजन होते. मात्र, गेल्या दहा वर्षात लोकसंख्या वाढीचा वेग ७० टक्के राहिला आहे. समाविष्ट गावांमध्ये झपाट्याने बांधकामे होऊन लोकसंख्या वाढली आहे. गेल्या पाच वर्षात एकट्या चिखलीत दुप्पट लोकसंख्या झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे २०२१ ची जनगणना झाली नाही. मात्र, लोकसंख्या वाढीचा वेग विचारात घेता ३० लाखांवर लोकसंख्या असावी असा अंदाज आहे. पाणीपुरवठ्याचे स्रोत मात्र वाढलेले नाहीत. त्यामुळे प्रतिमाणशी प्रतिदिन कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. मानांकानुसार १३५ लिटर पाणी निश्चित केले आहे. मात्र, २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय, सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. रात्री-अपरात्री पाणी भरावे लागत असून पुरेसे पाणी नळाला येत नसल्याने टॅंकरचा आधार घ्यावा लागत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.

उपाययोजना सुरू आहेत ः आयुक्त
पाण्याचा अपव्यय टाळणे, गळती रोखणे, अनधिकृत नळजोड अधिकृत करणे. मीटर रिडिंगचे काम करून घेणे, पाण्याचा फेरवापर वाढविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी उद्यानांना देणे, प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसीला देऊन शुद्ध पाणी त्यांच्याकडून घेणे, सखल व नवीन भागात जास्त दाबाने पाणीपुरवठा करणे, असा उपाययोजना केल्या जात आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करून पाण्याचा प्रश्न पुढील कालावधीत सोडविला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिदिन कोणाला किती पाणी मिळतंय...
लोकसंख्या (टक्क्यांत) / पाणी (प्रतिव्यक्ती लिटर)
११ / ० ते ४५
८ / ४५ ते ९०
१३ / ९० ते १३५
२२ / १३५ ते २००
१९ / २०० ते ३००
१४ / ३०० ते ५००
१२ / ५०० पेक्षा अधिक
(महापालिकेने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत नोंदलेले निरीक्षण. ३२ टक्के नागरिकांना १३५ लिटरपर्यंत. ४१ टक्के नागरिकांना १३५ ते ३०० लिटर आणि २७ टक्के नागरिकांना ३०० लिटरपेक्षा अधिक पाणी मिळत आहे.)

---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com