
पिंपरी फ्लेक्स फॉलोअप
फ्लेक्स काढा; अन्यथा गुन्हे
महापालिका आयुक्तांचा खासगी जागा मालकांना इशारा
पिंपरी, ता. ८ ः महापालिकेतर्फे खासगी जागांवरील अनधिकृत जाहिरात फलक काढण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. ज्यांच्या खासगी जागांवर अनधिकृत जाहिरात फलक उभे असतील, त्यांनी स्वतः तत्काळ काढून घ्यावेत. अन्यथा, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र विरूपण कायदाअन्वये गुन्हे दाखल करून काढण्यात येतील, असा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिला आहे.
शहराचे विद्रुपीकरण रोखून सौंदर्यात वाढ व्हावी, यासाठी ‘सकाळ’ने घेतलेल्या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्तांनीही जाहीर सूचनेद्वारे अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग उभारलेल्या खासगी जागा मालकांना कारवाईचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शहराचा बकालपणा कमी करण्यासाठी व शहराचे सौंदर्य सुधारण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. दिवसेंदिवस अनधिकृत प्लेक्स, बॅनर, जाहिरात फलक यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. तात्पुरते फ्लेक्स लावण्यासाठी महापालिकेने शहरात ११२ जागा निश्चित केल्या आहेत. त्याठिकाणी जाहिरात करण्यासाठी ऑनलाइन परवाना घेऊन निश्चित केलेल्या आकाराचे फलक त्याच ठिकाणी लावायचे आहे. अन्य ठिकाणी लावलेले फलक महाराष्ट्र विरूपण कायदाअन्वये गुन्हे दाखल करून काढण्यात येतील. यापूर्वी ११८ जागांवरील १३५ फलक महापालिकेने काढलेली आहेत. आता विनापरवाना जाहिरात फलक काढले जाणार आहेत. ते काढण्याअगोदर संबंधित जाहिरातदार व जागा मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
फ्लेक्स डिझाईन स्पर्धा
महापालिकेच्या जागेवर आकर्षक स्वरूपात जाहिरात फलक उभे करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी सर्वोत्कृष्ट डिझाईन प्राप्त होण्यासाठी देश पातळीवर स्पर्धा आयोजित केली आहे. त्यातून निवडलेले आकर्षक जाहिरात फलक लवकरच महापालिकेतर्फे उभे केले जाणार आहेत, असे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सर्व फ्लेक्स प्रिंटर्स व्यावसायिकांना नोटीस देऊन, फ्लेक्सवर तो लावणाराचा वा त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक छापावा. संबंधित फ्लेक्स किती दिवसांसाठी लावला आहे. त्याची तारीख नमूद करून त्याचे परवाना शुल्क लिहावे. परवाना दिलेले फ्लेक्स व होर्डिंग्ज लावण्यासाठी जागा निश्चित कराव्यात. विना परवाना फ्लेक्स लावणाऱ्यांकडून दहापट दंड वसूल करावा.
- राजेंद्र शाह, तळेगाव दाभाडे
शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी, बेकायदा होर्डिंग व किऑस्कवर कारवाई तातडीने होण्यासाठी परवाना विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव, हुद्दा व त्यांच्याकडे असलेल्या प्रभागाची माहिती असा व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करावा. त्यावर आलेल्या तक्रारींचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तातडीने कारवाई होईल. दंडात्मक कारवाईमुळे महापालिकेचा महसूल वाढेल.
- सरदार रवींद्र सिंह, पिंपरी
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..