SLUGआळंदीत तुकारामांची पालखी.. देहू देवस्थानकडून आळंदी देवस्थानचे निमंत्रण स्विकारले /SLUG>
आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा
आषाढी वारी परतीचा प्रवास; संत तुकाराम महाराजांची पालखी आळंदीहून देहूला जाणार
आळंदी/देहू, ता. १५ ः संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५०वा जन्मोत्सव सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७५वा वैकुंठगमन सोहळा यांचे औचित्य साधून संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा परतीच्या प्रवासात आळंदीत रविवारी (ता. २०) माउलींच्या भेटीला येणार आहे. २८ जुलै २००८ नंतर पुन्हा एकदा दोन्ही संतांच्या अनुपम भेटीचा दुग्धशर्करा योग वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार आहे.
आळंदी देवस्थानचे पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे आणि विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी देहू देवस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांना परतीच्या मार्गावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत आणण्यासाठी ११ जुलै रोजी लेखी पत्राद्वारे निमंत्रण दिले होते. त्याचा स्वीकार करीत जालिंदर महाराज मोरे यांच्यासह पालखी सोहळाप्रमुख दिलीप महाराज मोरे आणि अन्य विश्वस्तांच्या सह्यांद्वारे देहू देवस्थानने मंगळवारी (ता. १५) पत्र जाहीर केले, तसेच गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे हे निर्णय प्रक्रियेत होते. दरम्यान, परतीच्या मार्गावर दोन्ही देवस्थानांच्या विश्वस्तांमध्ये चर्चा होत होत्या. दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाल्या आणि त्याला आता मूर्त स्वरूप आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा आळंदीत येणार असल्याच्या निर्णयाचे आळंदीकरांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
देहू देवस्थानकडून भेटीबाबतचे निमंत्रण स्वीकारताना सांगण्यात आले की, संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५०वा जन्मोत्सव वर्ष आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ३७५वे वैकुंठगमन सोहळा वर्षाचा हा दुग्धशर्करा योग आहे. या निमित्ताने आळंदीत येण्याचे निमंत्रण आळंदी देवस्थानने दिले. त्याबद्दल संत तुकाराम महाराज यांच्या सर्व वंशज मोरे मंडळींना अत्यानंद झाला आहे. १६८५मध्ये तपोनिधी नारायण महाराज हे आळंदीमार्गेच वारी करीत होते. त्या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळणार आहे.
विश्वस्त विक्रमसिंह मोरे म्हणाले, ‘‘तपोनिधी नारायण महाराज मोरे यांचा वारीचा सोहळा १६८५ ते १८३१ या दरम्यान याच मार्गाने सुरू होता. परतीच्या प्रवासात पंढरपूर ते आळंदी, आळंदी ते देहू असा परतीचा प्रवास होता. पुढे १८३२ ला दोन्ही वेगळे सोहळे झाले. यंदा भेटीचा योग चांगला आल्याने वारकरी संप्रदाय खूश आहेत.’’
आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, ‘‘माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा दिवस असेन की दोन्ही संतांच्या स्वागताची संधी प्रशासन म्हणून मिळणार आहे. शहरात ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत कमानी, रांगोळ्या तसेच पुष्पवृष्टी केले जाईल. या बाबत विश्वस्त मंडळाशीही चर्चा केली जाईल.’’
असे आहे पालखी मार्ग नियोजन
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी (ता. १८) आणि शनिवारी (ता. १९) पुणे मुक्कामी असेल. रविवारी (ता. २०) सोहळा आळंदीकडे मार्गस्थ होईल. आळंदीत माउलींचा सोहळा पोहोचल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत प्रवेश करेल. येथे सोहळ्याचा मुक्काम असेल. संत तुकोबारायांचा सोहळा सोमवारी (ता. २१) आळंदीतून सकाळी निघून डुडुळगाव, मोशी, चिखली भागातून जाणार आहे.
चिखलीकरांना दर्शनाची संधी
टाळगाव चिखली ग्रामस्थांचे संत तुकाराम महाराजांशी भावनिक नाते आहे. वैकुंठगमनप्रसंगी महाराजांचे टाळ येथे पडल्याची भावना ग्रामस्थांची आहे. या निमित्ताने त्यांनाही स्वागताची संधी मिळणार आहे.
माउलींचा जन्मोत्सव आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा साजरा केला जात आहे. सर्वांच्या दृष्टीने भेटीचा आनंदाचा सोहळा असेल. दोन्ही देवस्थानच्या विश्वस्तांची भावना दोन संतांच्या भेटीची होती. माउलींचा पालखी सोहळा रविवारी काहीसा लवकर आळंदीत पोहोचेल असे नियोजन विश्वस्त मंडळांकडून केले जाईल. सोहळा आळंदीत पोहोचल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा समाधी मंदिरात येईल. कारंजे मंडपात संत तुकाराम महाराजांची पालखी ठेवण्याचे नियोजन आहे.
- योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त, आळंदी देवस्थान
देहू देवस्थानकडून आजच निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. आळंदी देवस्थानच्या सर्व विश्वस्तांच्या बैठकीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागताबाबतचे नियोजन केले जाणार आहे.
- डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
परतीच्या प्रवासात पालखी सोहळा रविवारी पिंपरीतून निघून आळंदीत मुक्कामासाठी पोहोचेल. सोमवारी (ता. २१) पालखी सोहळा आळंदीतून मोशी, टाळगाव चिखली, तळवडे, विठ्ठलवाडी मार्गे देहूत पोहोचेल. आळंदी संस्थानने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास आळंदीमार्गे व्हावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेतला असून, याबद्दल वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे.
- जालिंदर महाराज मोरे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान, देहू
आळंदी संस्थानने आमंत्रण दिले. त्याचा आम्हाला आनंद झाला आहे. पालखी सोहळा नेहरूनगर, भोसरीमार्गे आळंदीकडे जाणार आहे. या गावातील भाविकांना ग्रामस्थांना आनंद होणार आहे. संत तुकाराम महाराज आषाढ वद्य एकादशीला आळंदीत माउलींच्या पुढे कीर्तन करीत होत होते, याचा मोरे वंशजांना आनंद आहे. या निर्णयामुळे समस्त वारकरी संप्रदायाला आनंद झाला आहे.
- दिलीप महाराज मोरे, सोहळाप्रमुख, संत तुकाराम महाराज संस्थान
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.