slugआळंदीत दोन पालख्यांच्या दर्शनाने भारवले अलंकापूरी /slug>
दोन्ही संतांच्या दर्शनाने वैष्णव आनंदले
एकादशीच्या पर्वकाळावर संतभेटीचा सोहळा; माउलीची आज पालखी प्रदक्षिणा
आळंदी, ता. २० ः रांगोळ्यांच्या पायघड्या...बॅण्डचा सूर....फटाक्यांचीची आतषबाजी...टाळ मृदंगाचा गजर...अन् ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष...अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो वैष्णवांसमवेत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदीत मुक्कामी विसावल्या. दोन्ही संतांच्या एकाच वेळी दर्शनाने आळंदी आणि पंचक्रोशीतील भाविक आनंदले. संत तुकोबारायांचा पालखी सोहळा २००८ नंतर हा योग भाविकांनी अनुभवला. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज भेटीचा सोहळा एकादशीच्या पर्वकाळावर सोमवारी (ता. २१) पहाटे साडेपाच वाजता होणार आहे.
आषाढी वारीसाठी तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास करून माउलींचा पालखी सोहळा आज आळंदीत आला. तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ३४ दिवसांचा प्रवास करून परतीच्या प्रवासात आळंदीत आला. पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम उरकून सकाळी दहा वाजता माउलींचा पालखी सोहळा भवानी पेठेतून आळंदीच्या दिशेने निघाला. येरवडा, विश्रांतवाडी, दिघीमार्गे सोहळा धाकट्या पादुका येथे आला. रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी आळंदीकरांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी स्वागत कमानी, रांगोळ्यांच्या पायघड्या होत्या. वारकरी विद्यार्थी टाळ मृदंगाचा गजर करीत होते. बॅण्डच्या सुरात दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. चोपदारांनी माउली आल्याचा निरोप देऊळवाड्यात सायंकाळी पावणे सहा वाजता दिला. या वेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा मालक ऋषिकेश आरफळकर, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, ॲड. राजेंद्र उमाप दिंडी घेऊन माउलींना वेशीपाशी सामोरे गेले. माउलींना दहिभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सोहळा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाले. पालिका चौकात खांदेकरांनी माउलींची पालखी रथातून उतरवत खांद्यावर घेत राममंदिर, हरिहरेंद्र मठ स्वामी मंदिरमार्गे देऊळवाड्यात आणली. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर माउलींच्या समाधी शेजारी आरती झाली. मानकरी, दिंडीकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला.
दरम्यान, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, अॅड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील देहूफाटा येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सामोरे गेले. नऊ वाजता ज्ञानोबा तुकारामांचा गजरात संत तुकोबारायांची पालखी देऊळवाड्यात आली.दहाच्या सुमारास पालखी वीणा मंडपात आली. त्यानंतर ती कारंजे मंडपात ठेवण्यात आली. यावेळी आरती झाली. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, चोपदार उपस्थित होते. देहूकरांच्या वतीने मानाचे कीर्तन झाले.
आळंदीकरांकडून जोरदार स्वागत
दोन्ही संतांच्या पालखी आळंदीत आल्यावर बॅण्ड, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दोन्ही पालख्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. पिठलं भाकरी, शिरा, पुलाव, पुरणपोळी प्रसाद वाटपाने वारकऱ्यांचे स्वागत केले. दरम्यान सोमवारी एकादशीच्या दिवशी संत तुकाराम महाराजांचा सोहळा संतभेटीनंतर डुडुळगाव मोशी, चिखलीमार्गे देहूला मार्गस्थ होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दुपारी बारानंतर नगरप्रदक्षिणेसाठी जाणार आहे. यावेळी हजेरी मारुती मंदिरात दिंड्यांच्या हजेऱ्या होतील.
--------------
आळंदी ः संत तुकाराम महाराज पालखी रविवारी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात विसावली.
आळंदी ः संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देऊळवाड्यात आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.