आळंदीतील शेख भगिनींना ज्ञानेश्वरीची गोडी

आळंदीतील शेख भगिनींना ज्ञानेश्वरीची गोडी

Published on

आळंदी, ता. २९ : मूळचे कर्नाटकातील शेख कुटुंबीय रोजंदारीसाठी आळंदीत आले. वडील गवंडी काम तर आई घरकाम करून दोन मुली आणि एका मुलाला वाढवले. यातील सादिया आणि फर्जना या दोघींनी आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात शिकत असताना ‘ओळख ज्ञानेश्वरीचा’ या अभ्यासात भाग घेतला. त्यातून त्यांना ज्ञानेश्वरीची गोडी लागली. या वर्षी आठवीत शिकणारी फर्जना शेख हिने या अभ्यासक्रमात प्रावीण्य मिळविल्याबद्दल तिचा विद्यालयाकडून सन्मान करण्यात आला. शालेय स्तरावर सर्वांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे.
शालेय मुलांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबर मूल्यशिक्षण आणि संस्कारांची लहान वयातच पेरणी व्हावी, या दृष्टिकोनातून पाच वर्षांपासून आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या चौथ्या वर्गातील १८ गुणवंत विद्यार्थी, हरिपाठ पाठांतर आणि हरिपाठ अर्थ विवेचन परीक्षेतील गुणवंत दहा विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यात सन्मानार्थी म्हणून फर्जना हीदेखील होती. दोन वर्षांपूर्वी फर्जना हिची बहीण सादिया शेख हिनेही ‘ओळख ज्ञानेश्वरी अभ्यासक्रमा’त सहभाग घेतला होता. ती ज्ञानेश्वर विद्यालय दहावीत शिकत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना संतांच्या नवलकथा पुस्तक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच या उपक्रमाच्या पाचव्या पर्वास प्रारंभ करण्यात आला.
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त शिवाजी महाराज काळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उद्योजक लक्ष्मण बालवडकर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, सुभाष महाराज गेठे, श्रीधर घुंडरे, अनिल वडगावकर, धनाजी काळे, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, श्रेणिक क्षीरसागर आदी उपस्थित होते. आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवस्थान ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि आळंदी शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ उपक्रमात नव्याने सहभागी विद्यार्थ्यांना फाइल आणि ज्ञानेश्वरीची पारायण प्रतीचे वाटप करण्यात आले.
वडगावकर म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नसून, ते आदर्श जीवन जगण्याचे शास्त्र आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासाने सकारात्मक बदल झाला आहे. एरवी शाळेचा उपक्रम दुसरी शाळा स्वीकारत नाही, परंतु हा उपक्रम सुमारे ९७ शाळांनी स्वीकारला आहे, हेच या उपक्रमाचे फलित आहे. ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे म्हणाले, ‘‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमातून मूल्यशिक्षण दिले जात आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानेश्वरीतील विचारांचा प्रसार करण्यासाठी सर्व क्षेत्रातून प्रयत्न व्हायला हवेत.’’ सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले. प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘‘ओळख ज्ञानेश्वरी माध्यमातून मला सखोल ज्ञान मिळत आहे. हरिपाठाचा अर्थ मला कळू लागला आहे. आळंदीत अनेक मुलेमुली धार्मिक शिक्षण घेतात. मलाही वाटले आपणही शिकावे म्हणून या उपक्रमात सहभागी झाले. पुढे जाऊन संधी मिळाली तर मी ही ज्ञानेस्वरी हरिपाठाबाबत मला जे कळाले ते इतरांनाही सांगेन.’’
- फर्जना शेख, विद्यार्थिनी

आळंदी : येथील ज्ञानेश्वर विद्यालयात ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ उपक्रमांतर्गत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
आळंदी : ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ उपक्रमात प्रावीण्य मिळवलेली फर्जना शेख हिचा सन्मान करताना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com