
कडधे बंधाऱ्याच्या कामाला वेग
ऊर्से, ता. १८ : पवन मावळातील अतिशय महत्त्वाचा आणि हजारो नागरिकांच्या दळणवळणाशी निगडीत असलेला व १३ कोटी ९३ लाख रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या कडधे बंधाऱ्याचे काम वेगाने सुरू आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या हे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे.
पंचवीस गावांसाठी आवश्यक
जवळपास तीस ते चाळीस वर्षांपूर्वी कडधे येथील पवना नदीवर बंधारा बांधण्यात आला होता. त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पाणी बंधाऱ्यावरून जाते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात दोन्ही बाजूकडील वाहतूक, दळणवळण बंद होत असे. पवनानगर मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी जवळ असणारा हा एकमेव मुख्य बंधारा. पवन मावळातील जवळपास वीस ते पंचवीस गावांसाठी हा अतिशय महत्त्वाचा पूल आहे. मुंबई-पुणे महामार्गावरून पवना धरण, तुंगी किल्ला, तिकोना किल्ला, लोहगड व मुळशी भागात जाण्याकरीता कडधे बंधाऱ्यावरूनच जावे लागते. त्यामुळेच येथे एक उंच पूल होणे खूप गरजेचे होते. या बाबत येथील ग्रामस्थांनी अनेकदा मागणी केली होती. मात्र. अनेक वर्षापासून नवीन पूल न झाल्याने पंचक्रोशीतील नागरिक नाराज होते.
सद्यःस्थिती
- गेली वीस वर्षांत पवन मावळचा झालेला विस्तार पाहता या ठिकाणी वाहतूकही तेवढीच वाढली
- बांधकामे लागणाऱ्या वाहनांची रेलचेल वाढल्याने पुलावरही जास्त ताण वाढला
- बंधारा कमकुवत झाल्याने अनेकदा त्याची केली डागडुजी
- अवजड वाहनांना बंदी असताना देखील पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक केल्याने पूल कमकुवत
बंधाऱ्याच्या कामास वेग
- पंचक्रोशीतील गावांकरिता वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वशील असलेला हा बंधारा चाळीस वर्षानंतर येणार नव्याने उभारणार
- दोन वर्षाचा कालावधी असलेल्या या बंधाऱ्याचे काम ४५ टक्के पूर्ण
- वाहनांसाठी दुसरा कच्चा रस्ता तयार
- पुलाच्या सुरू असलेल्या कामाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त
‘‘कडधे बंधाऱ्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी असून, काम जोरात सुरू आहे. ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.’’
- आर के गावित, कनिष्ठ अभियंता
बंधाऱ्याबाबत
- लांबी ः ८२.०० मीटर
- रुंदी ः ७.५० मीटर
- उंची ः ५.०० मीटर
- रक्कम ः १३ कोटी ९३ लाख
- काम पूर्ण करण्याची एकूण कालावधी ः २ वर्ष