
पुसाणेत कांदापीक शेतीशाळा उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद
ऊर्से, ता. २४ : मौजे पुसाणे येथे तालुका कृषी अधिकारी मावळ व मंडळ कृषी अधिकारी काळेकॉलनी यांच्यावतीने सन
२०२२-२३ या वर्षात कृषी व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा उपक्रम राबविण्यात आला . या शेतीशाळेस महिलांनी उस्फूर्त सहभाग घेतला. कांदापीक शेतीशाळा उपक्रमात कांदापिकाच्या वाढीनुसार वर्ग घेण्यात येत असून कांदापिक बियाणे निवड, कांदापिक कीड व रोग व्यवस्थापन याकरिता पिकामध्ये कामगंध सापळे, पिवळे निळे चिकट सापळे, पक्षी थांबे इत्यादींचा वापर करून कीड नियंत्रण करता येते. रासायनिक कीटकनाशकांचा वापर व त्यावरील खर्च कमी करण्यासाठी घरच्या- घरी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क तयार करणे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पुसाणे या गावात कांदापीक लागवड जास्त प्रमाणात होते, कांदापिकास कृषी तंत्रज्ञानाची जोड देवून पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभाग शेतीशाळा माध्यमातून काम करत आहे. सदर शेतीशाळा वर्गास आत्मा योजनेचे बीटीएम राहुल घोगरे, रिसोर्स फॉर्मर नितीन गायकवाड, कृषी सहायक अक्षय डूमने, मनीषा घोडके उपस्थित होते. शेतीशाळा वर्गाचे नियोजन कृषी सहायक स्मिता कानडे यांनी केले. पुसाणे येथे घेण्यात आलेल्या शेतीशाळा वर्गास महिला शेतकरी आरती वाजे, ज्योती वाजे, रूपाली वाजे, अलका मांडेकर, जया वाजे, कांताबाई वाजे, मालती आंग्रे, मनीषा वाजे, सारिका वाजे, शोभा वाजे, जिजाबाई वाजे, सारिका आवंढे, मनीषा मालपोटे, मोनिका वाजे, चंद्रभागा वाजे, अश्विनी वाजे, सुनीता वाजे, मनीषा आव्हाडे या प्रगतशील महिला शेतकरी, विद्यार्थी उपस्थित होत्या.
‘‘पवन मावळ भागात कांदा पीक लागवड मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे पीक महत्त्वाचे असल्याने शेतीशाळा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना कांदापीकबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. बियाणे निवड, लावणी, काढणी व साठवणी पर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.’’
-स्मिता कानडे, कृषीसहायक, पुसाणे
‘‘रब्बी हंगामातील कांदापिक हे महत्त्वाचे पीक आहे. पवनमावळात कांदापिकाचे प्रमाण जास्त आहे. महिला शेतकऱ्यांना शेतीशाळेच्या माध्यमातून कांदापिका बाबत सविस्तर माहिती देऊन त्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे.’’
-दत्ता शेटे, मंडळ कृषी अधिकारी,काळेकॉलनी