

ऊर्से, ता. १६ : यंदा मॉन्सूनने सरासरी आगमनाची वेळ चुकवली असून, मागील महिन्यापासून पडणारा अवकाळी पाऊस ग्रामीण भागात न पडता शहरी भागात पडत असल्याने शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन ढासळले आहे. पाऊस लांबल्यास खरिपातील जवळपास ७०० हेक्टरवरील बहुतांश पिकांना फटका बसेल. तसेच उत्पादकतेवर याचा मोठा परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
साधारणतः आठवडाभराच्या उशिराने मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यामुळे २६ जूननंतरच मॉन्सूनचे आगमन होईल, असा अंदाज आहे. शेतकरी भाताच्या रोपवाटिका टाकाव्यात की नाही या चिंतेत आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी रोपवाटिका टाकल्या आहेत. तालुक्यात शेतकरी खरिपामध्ये भात, सोयाबीनसह अन्य पिकांची लागवड करतात. खरिपातील पिकांच्या भरवशावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन ठरलेलं असते. परंतु खरिपासाठी आवश्यक असलेला पाऊसच लांबला तर मात्र परिस्थिती बिकट होते. त्यामुळे सर्व शेतकरी पावसाची आतुरतेने बघत आहेत. हवामान विभागाकडून यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु, पाऊस वेळेत पडला नाही तर त्याचा फटका पिकांना बसू शकतो. सद्य स्थितीला शेतकऱ्यांनी मशागती करून बियाणे, खते खरेदी केली आहेत.
भाताची तेरा हजार हेक्टरवर लागवड
मावळ तालुक्यात भात या मुख्य पिकाबरोबरच सोयाबीन, भुईमूग व इतर कडधान्याची लागवड केली जाते. भात या पिकांची तालुक्यात १३ हजार हेक्टरवर लागवड होणार असून, सोयाबीनची ५५० हेक्टरवर लागवड होणार आहे. तसेच इतर पिकेही घेतली जातात.
पेरणी केव्हा करावी?
शंभर मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. मावळमध्ये शक्यतो धूळवाफेवरच भात रोपवाटिका तयार करण्यात येतात. परंतु यावर्षी पाऊस उशिरा असल्याने धूळवाफेवर रोपवाटिका करण्याचे शेतकऱ्यांनी टाळले पाहिजे. गादीवाफ्यावर रोपवाटिका केल्याने निश्चित फायदा होतो. भाताची पुनर्लागवड करताना रोप २५ दिवसांचे असणे अपेक्षित आहे. मात्र, पाऊस कमी असल्यास भात रोपांचे वय ४० दिवस असले तरी चालते. सोयाबीनची लागवड करताना विलंब झाला तरी त्याचा उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही.
‘‘भात पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया, गादीवाफ्यावर रोपवाटिका, चारसूत्री एस.आर.टी. लागवड, युरिया ब्रिकेट खत, तण व पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.’’
- विकास गोसावी, कृषी सहायक
‘‘मावळ तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पूर्ण तयारी केली असून, पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कृषी विभागाच्या सल्ल्याने भात पिकामध्ये करावा.’’
- दत्तात्रेय पडवळ, तालुका कृषी अधिकारी, मावळ
फोटो ः 02377
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.