पवन मावळातील शाळांमध्ये
पालखी सोहळा उत्साहात

पवन मावळातील शाळांमध्ये पालखी सोहळा उत्साहात

Published on

ऊर्से, ता. ५ : पवन मावळातील जिल्हा परिषद शाळा मळवंडी ढोरे, ऊर्से जिल्हा परिषद व श्री पद्मावती विद्यामंदिर आदी शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उत्साहाने व आनंदात संपन्न झाला.
जिल्हा परिषद शाळा मळवंडी-ढोरे येथे सरोजा अंबुलगे व पूजा राऊत या महिला भगिनींच्या हस्ते पालखी सोहळ्याचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. ज्ञानोबा माउली तुकाराम, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, तसेच पावली चालती पंढरीची वाट, चंद्रभागेच्या तिरी, देव माझा माझा इत्यादी भजने, अभंग विद्यार्थ्यांनी सादर केले.
ग्रामस्थ महिला भगिनी तसेच विद्यार्थिनींनी फुगड्या व फेर धरून दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. भक्तिमय वातावरणामध्ये मळवंडी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रसाद देऊन पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला. मुख्याध्यापक राजू भेगडे व शिक्षक धीरजकुमार जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला.

ऊर्से जिल्हा परिषद व श्री पद्मावती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी विठू नामाचा गजर करीत आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालखीत श्री विठ्ठल-रुखमाई मूर्ती ठेवण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारशाची जाण असावी, या हेतूने आषाढी एकादशीनिमित्त या दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीत प्रारंभी भगवा ध्वज घेऊन नाचणारे बालवारकरी, त्यांच्यामागे विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिरूपातील विद्यार्थी, टाळकरी, मृदंगवादक, विणेकरी व डोक्यावर ग्रंथ, तुळशी व रोपे घेऊन आलेल्या बालमहिला वारकरींसह सर्व विद्यार्थी ‘विठुनामाचा’ जयघोष करीत सहभागी झाले होते. गावातील दानशूर हरिभक्तांनी बालवारकऱ्यांना खाऊ वाटप केला. श्री पद्मावती मंदिरात विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी फुगडी व पाऊल खेळण्याचा आनंद घेत दिंडीत रंग भरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com