वणव्यांमुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न
ऊर्से, ता. ९ : मावळ तालुक्यातील डोंगराळ भागात लागलेल्या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर गवत जळून खाक झाले आहे. त्यामुळे या भागातील गुरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. धामणे येथील डोंगरावर लागलेल्या वणव्यामुळे सुमारे एक हजार जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मावळ तालुक्यात डोंगरांना आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तालुक्यातील बहुतांश डोंगररांगा काळवंडलेल्या अवस्थेत दिसून येतात. डोंगरकपारी तसेच दऱ्या-खोऱ्यांमध्ये असणारे गवत जपून ठेवले, तर चार महिन्यांच्या काळात जनावरांना काही प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकतो. मात्र, वणव्यांमुळे ही सर्व नैसर्गिक संपत्ती नष्ट होत आहे. यामुळे जैवविविधतेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी होणारे हे वणव्याचे अग्नितांडव रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे.
डोंगरावर दरवर्षी वणवे का लागतात, हे आता गुपित राहिलेले नाही. अनेकवेळा अतिक्रमण करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांची शिकार सोपी व्हावी, यासाठी मुद्दाम वणवे लावले जातात. तसेच वणवा लावल्यास पुढील वर्षी उत्तम प्रतीचे गवत उगवते, या गैरसमजामुळे ग्रामीण भागात डोंगरांवर आग लावली जाते.
जंगलाला आग लावणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. यावर्षी गवत जाळले, तर पुढील वर्षी चांगले गवत येते, हा नागरिकांचा मोठा गैरसमज आहे. गवत रानात शिल्लक राहिल्यास त्याचे नैसर्गिक खत बनते. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही आणि पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. हेच गवत पावसाळा सुरू होईपर्यंत प्राण्यांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरते. मात्र, गवत जाळल्यास जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते आणि पाणी जमिनीत पुरेशा प्रमाणात मुरत नाही. त्यामुळे कोणत्याही गैरसमजातून जंगलाला आग लावणे हे भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही दरवर्षी तालुक्यात डोंगरांवर आग लावण्याच्या घटना घडत आहेत.
धामणे येथील गोशाळेत सुमारे ८०० जनावरे आहेत, तर गावामध्ये आणखी २०० जनावरे आहेत. या सर्व जनावरांसाठी एप्रिल महिन्यापर्यंत डोंगरावरील गवत चाऱ्यासाठी उपलब्ध असते. मात्र, या वणव्यामुळे पुढील पाच महिने चारा उपलब्ध करून देणे अत्यंत अवघड होणार आहे. आम्ही रात्री गस्त घालण्याचे काम करत असतानाही काही विकृत व्यक्तींकडून वणवे पेटवले जात असल्याचे धामणे गोशाळेचे कोशाध्यक्ष रूपेश गराडे यांनी सांगितले.
धामणे : येथील डोंगरावर लागलेल्या वनव्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

