अनियमित एसटी सेवेमुळे प्रवाशांचा संताप

अनियमित एसटी सेवेमुळे प्रवाशांचा संताप

भोसरी, ता. २२ ः एसटी महामंडळाच्या बस शुक्रवारी (ता. २१) अनियमित धावत असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. काही प्रवाशांनी एसटी वाहतूक नियंत्रकाकडे लेखी तक्रार दाखल केल्या आहेत.
सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. शनिवारी (ता. २२) अक्षय तृतीया, रमजान ईद, श्री बसवेश्वर महाराज जयंती आदी आलेले सण आणि त्यानंतर येणाऱ्या रविवारची (ता. २३) सुटी. अशा सलग आलेल्या सुट्यांमुळे गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड वाढली होती. त्यातच एसटी बसमध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट असल्यानेही एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. मात्र शुक्रवारी (ता. २१) एसटी अनियमित वेळेत धावत असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
भोसरीतून पुणे-नाशिक महामार्ग जातो. या महामार्गावर कासारवाडीजवळील नाशिक फाटा, भोसरी-आळंदी चौक, धावडेवस्ती, मोशी आदी ठिकाणी थांबे आहेत. शुक्रवारी (ता. २१) नाशिक फाट्यावरून रात्री अकरा वाजता नाशिकला जाण्यासाठी एसटीची वेळ आहे. त्यानुसार प्रवासी रात्री साडेदहा वाजताच एसटी स्थानकावर उपस्थित झाले. मात्र मध्यरात्री बारा वाजून गेल्यावरही एसटी न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

‘‘पुणे-नाशिकची अकरा वाजताची बस नाशिक फाट्यावर रात्री बारा वाजून दहा मिनिटापर्यंत आलेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी कोठे व किती वेळ थांबायचे, एसटी महामंडळाने याची दखल घेतली पाहिजे.’’
- सुरेश खिंवसरा, प्रवासी

‘‘भोसरीतील भोसरी-आळंदी चौकातील एसटी बसच्या थांब्यावर निवारा शेड नाही. त्यामुळे पीएमपीच्या निवारा शेडमध्ये थांबावे लागते. मात्र प्रवाशांची संख्या जास्त असल्याने हे निवारा शेड पुरत नाही. त्यातच एसटीही वेळेवर येत नसल्याने समस्या वाढली आहे.’’
- सुनंदा प्रवाशांचे गायतोंडे, प्रवासी

सलग सुट्ट्यांमुळे आणि प्रवाशांची संख्या वाढली शुक्रवारी वाढली होती. त्यातच राजगुरुनगर, चाकण येथील रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळेही बस उशिरा धावत होत्या. मात्र, पुणे-नाशिक महामार्गावरील कोणतीही बस रद्द न करता सर्व बस सोडण्यात आल्या होत्या.
- विजय खोपडे, वाहतूक नियंत्रक, शिवाजीनगर, एसटी आगार


रणरणत्या उन्हात एसटीची प्रतीक्षा
बऱ्याच ठिकाणी एसटीचे विनंती थांबे आहेत. बऱ्याच थांब्यावर निवारा शेड नसल्याने एसटीची प्रतीक्षा रणरणत्या उन्हात करावी लागत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यातच एसटी बस अनियमित वेळेत येत आली तर प्रतिक्षेची वेळ वाढत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

३८७०६
नाशिक फाटा ः येथील एसटी थांब्यावर शुक्रवारी रात्री बस एक तासापेक्षा अधिक उशिरा धावल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com