भोसरी एमआयडीसीत भूयारी गटारांचा अभाव

भोसरी एमआयडीसीत भूयारी गटारांचा अभाव

भोसरी ‘एमआयडीसी’त
भुयारी गटारांचा अभाव
सीइटीपी नसल्याने रासायनिक सांडपाणी थेट नदीत

संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा

भोसरी, ता. २९ : भोसरी एमआयडीसीत भुयारी गटारे सुमारे ६१ वर्षांपासून नाहीत. त्यातच रासायनिक प्रक्रिया प्रकल्प नसल्याने काही कंपन्यांतील रासायनिक-औद्योगिक सांडपाणी नाल्याद्वारे नदीमध्ये मिसळले जाऊन, प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. त्याचप्रमाणे कंपन्यांजवळ असणारी पावसाळी गटारे माती, कचऱ्याने तुंबलेली असल्याने कंपन्यांतील टाकाऊ पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे नागरिक आणि कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाच्या पाण्यासाठी भोसरी ‘एमआयडीसी’च्या काही भागात १९९३-९४ मध्येउघडी गटारे बांधण्यात आली होती. मात्र; त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या गटाराची उभारणी करण्यात आलेली नाही. अस्तित्वात असलेल्या उघड्या पावसाळी गटारामध्ये माती, कचरा साचून ती भरून गेली आहेत. कंपन्यांनीही याच गटारांत पाण्याचा निचरा होणारी लाईन जोडली आहे. त्यामुळे तुंबलेल्या गटारातून हे पाणी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरून वाहत आहे.

भोसरी एमआयडीसीतील ‘जे ब्लॉक’मधून सेन्च्युरी एन्का कंपनीपर्यंत जाणाऱ्या पावसाळी पाण्याच्या नैसर्गिक नाल्यावर जागोजागी लघुउद्योजकांनी अतिक्रमण केलेले दिसते. तिथे कचरा, गाळ साचला असून गवत, झुडपेही उगवले आहेत. नागरी वस्तीतील सांडपाणी वाहिन्या मैलाशुद्धीकरण केंद्रास जोडल्या आहेत. मात्र; ‘एमआयडीसी’मधील सांडपाणी वाहिन्याच नसल्याने कंपनीतील रसायनमिश्रित पाणी नैसर्गिक नाल्यात सोडले जाते. या नाल्यातील पाणी नदीला मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात नदीचे प्रदूषण होत आहे.

रासायनिक प्रकिया प्रकल्प असल्याशिवाय नवीन उद्योगांना एमआयडीसीद्वारे परवानगी दिली जात नाही. मात्र; एमआयडीसीमध्ये ६००० हजार छोटे उद्योग आहेत. या उद्योगांना रासायनिक प्रकिया प्रकल्प आर्थिकदृष्ट्या उभारणे शक्य होत नाही. त्यामुळे छोट्या उद्योगांसाठी महापालिका, एमआयडीसी, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी एकत्र येऊन कॉमन इन्फ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लँट ( सीईटीपी) सुरू करण्याची घोषणा आठ वर्षापूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या काळात केली होती. मात्र; अद्यापही हा प्रकल्प सुरू झालेला नाही. त्यामुळे छोट्या उद्योगांचे रासायनिक, औद्योगिक सांडपाणी थेट नाल्यांद्वारे नद्यांमध्ये जात आहे.

महापालिकेची संदिग्ध भूमिका
सीईटीपीच्या उभारणीची जबाबदारी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सवर आहे. महापालिकेचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे पर्यावरण सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी माहिती दिली. या प्लांटसाठी कमी पडणारी आर्थिक तरतूद महापालिकेद्वारे केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
-------

महापालिका ‘एमआयडीसी’मधून प्रॉपर्टी कर गोळा करते. त्यामुळे भूमिगत गटारांची उभारणी करणे, ही महापालिकेचीच जबाबदारी आहे.
- नितीन वानखेडे, मुख्य अभियंता, एमआयडीसी.

भूमिगत गटारे ‘एमआयडीसी’द्वारे बांधणे गरजेचे होते. मात्र; त्यांनी ते काम केलेले नाही.
- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण, पिंपरी-चिंचवड महापालिका
-------


भोसरी ‘एमआयडीसी’मध्ये मुळात भुयारी गटारेच नाहीत. अपवादात्मक भागात असणारी गटारे माती, कचऱ्याने भरली आहेत. त्यामुळे लघुउद्योजकांच्या समस्या वाढल्या आहेत.
- प्रवीण लोंढे, लघुउद्योजक


‘सीईटीपी’साठी एमआयडीसीकडून जागा हस्तांतरण झाले आहे. सध्या या प्रकल्पासाठी भाग भांडवल जमा करण्याबरोबरच प्रकल्प अहवालावर अंतिम काम सुरू आहे. येत्या दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल.
- किरण हसबनीस, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे.

फोटो - भोसरी एमआयडीसी : येथील डब्ल्यू- ९६ ब्लॉकमधील शिवकिरण इंडस्ट्रीजजवळील रस्त्यावरून तुंबलेल्या गटारातून वाहणारे पाणी.

फोटो २ - भोसरी एमआयडी : येथील जे ब्लॉक ५२/३, नॅशनल प्रोफाइलजवळील नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून काबीज केलेली जागा आणि नाल्यात वाढलेली झुडुपे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com