होर्डिंग्जपेक्षा फ्लेक्सचा सुळसुळाट अधिक

होर्डिंग्जपेक्षा फ्लेक्सचा सुळसुळाट अधिक

भोसरी, ता.२ ः भोसरी, इंद्रायणीनगर आणि दिघी परिसरातील मुख्य चौक, रस्ते, शासकीय कार्यालये, उद्याने आदी भागांत अनधिकृतपणे फ्लेक्स लावण्यात येत असल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. होर्डिंग्जपेक्षा अनधिकृत फ्लेक्सचा अधिक सुळसुळाट झाला आहे. हे अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
भोसरीतील पीएमटी चौक, राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील जागा, आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पीसीएमटी चौक, भोसरी गावठाणातील बापूजीबुवा चौक, लांडेवाडी चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा दोन्ही बाजूंकडील सेवा रस्ते, इंद्रायणीनगरातील संतनगर चौक, श्री साई चौक, श्री तिरुपती बालाजी चौक, इंद्रायणी चौक, पुणे-नाशिक महामार्गावरील सद्‍गुरू डेपो चौक, महापालिकेच्या वैष्णोमाता शाळेजवळ, डिस्ट्रिक सर्कल तर दिघीतील छत्रपती संभाजी महाराज चौक, मॅगझीन चौक, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर चौक, पुणे-आळंदी रस्ता, जुना जकात नाका चौक आदी भागांसह इतरही भागांत अनधिकृतपणे फ्लेक्स लावल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबांचाही वापर
भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध मार्गदर्शक फलक लावले आहेत. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाखालील भोसरी-आळंदी रस्ता चौक, संविधान चौक, चांदणी चौक आदी भागांत वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. तेथे काहींद्वारे दिशादर्शक फलक आणि वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबालाही फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

झाडामुळे फ्लेक्स खाली पडण्याचा धोका टळला
पीएमटी चौकामध्ये लावण्यात आलेले मोठे फ्लेक्स परिसरात झालेल्या वादळवाऱ्यांमुळे झुकले होते. येथे असलेल्या झाडामुळे हे फ्लेक्स अडले गेल्याने खाली पडले नाहीत. त्याने मोठी दुर्घटना टळली.

मोठ्या फ्लेक्समुळे अपघाताचा धोका
भोसरीतील पीएमटी चौक, संविधान चौक, आळंदी रस्त्यावरील मंगलमूर्ती चौक, पीसीएमटी चौक, बापूजीबुवा चौक आदी भागांत प्रमाणापेक्षा अधिक लांबी, रुंदीचे फ्लेक्स लावले जातात. या फ्लेक्सला लोखंडी सांगाडाही असतो. जोराच्या वाऱ्यामुळे हे फ्लेक्स पडून नागरिकांना अपघातही होऊ शकतो.

फ्लेक्समुळे व्यावसायिकांचीही अडचण
दुकानासमोरील रस्त्यावर मोठ-मोठे अनधिकृत फ्लेक्स लावण्यात येत असल्याने दुकान झाकून जाते. त्याचा व्यवसायावरही परिणाम होत असल्याची तक्रार भोसरीतील काही दुकानदारांनी केली.

होर्डिंगपेक्षा फ्लेक्सचा सुळसुळाट
शहरात अवैध होर्डिंग्जपेक्षाही अनधिकृत फ्लेक्सचा जास्त सुळसुळाट झाला आहे. बांधकाम व्यावसायिक, राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस आणि इतर व्यावसायिक फ्लेक्सच्या माध्यमातून फुकट जाहिरातबाजी करत असतात. त्यामुळे, महापालिकेचे उत्पन्नही बुडत आहे. अनधिकृत फ्लेक्सविषयी महापालिका आयुक्तांकडे तक्रारही केली आहे.
- प्रशांत राऊळ, सामाजिक कार्यकर्ते.

‘क’ प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या परिसरात अनधिकृत फ्लेक्स काढण्याची कारवाई नियमित करण्यात येते. यापुढेही अनधिकृतपणे लावलेले फ्लेक्स काढण्यात येतील.
- अण्णा बोदडे, ‘क’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

‘इ’ प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या परिसरात अनधिकृत फ्लेक्स काढण्याची कारवाई दर तीन दिवसांनी करण्यात येते. अनधिकृत फ्लेक्स लावले जाऊ नयेत यासाठी ठोस उपाय योजना करण्यात येईल.
- राजेश आगळे, ‘इ’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com